रायगड : कर्जत शहरातून खालापूर तालुक्यातील लोधीवली येथील सेंट जोसेफ शाळेत विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या शाळेच्या बसमधील एका क्लीनरने तिघा चिमुरड्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. या प्रकरणात करण दीपक पाटील या स्कूल बसवर असलेल्या अटेंडरला अटक करण्यात आली. त्यानंतर आता याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सिसीलिया यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सेंट जोसेफ कॉन्व्हेट स्कुल, लोधीवली येथे शिकणाऱ्या तीन चिमुरड्या मुलींवर शाळेच्या बस मध्ये २४ वर्षीय तरुण करण दीपक पाटील (बस कर्मचारी) याने लैंगिक अत्याचार केले होते.गेली वर्षभर अत्याचार होत असताना त्या तीन मुलींनी आपल्या पालकांना ही माहिती दिल्यानंतर (१६ एप्रिल रोजी) कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वतीने आरोपी तरुणावर कठोर कारवाई व्हावी तसेच शाळेची मान्यता रद्द व्हावी,या गुन्ह्याचा खटला फास्ट ट्रॅक वर चालविण्यात यावा आणि मुख्याध्यापिका यांना बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली होतो..त्यांनतर राज्य सरकारचे शिक्षण उप संचालक आणि जिल्हा शिक्षण अधिकारी यांनी खालापूर तालुक्यातील लोधीवली येथील सेंट जोसेफ शाळेची चौकशी सुरू केली आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका सिस्टर सिसिलिया यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे.
दरम्यान,या आधी लहान मुलींची लैंगिक छळवणूक करणारा तरुण अटकेत असून ज्या स्कूल बस मध्ये हा प्रकार वर्षभर सुरू होता ती स्कूल बस देखील पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.