पुणे : शहरात दिवसेंदिवस अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता पुण्यातून आणखी एक धक्कादायक घटना समोर येत आहे. विद्यार्थी वाहतूक करणा-या बसचालकाने शाळकरी मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आरोपी बसचालकास कोंढवा पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत एका 15 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.
कय्यूम अहमद पठाण (वय 33, रा. विद्यानगर, कोंढवा खुर्द) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी एका शाळेमध्ये नववीच्या वर्गात शिकत आहे. आरोपी कय्यूम पठाण हा शाळेतील मुलांची मिनी स्कूल बसमधून ने-आण करत होता. बसमध्ये बरेच लहान मुले- मुली होती. पीडित विद्यार्थी बसमधील मागच्या बाजूला बसायची. (दि. 11 डिसेंबर) रोजी मुलगी बसमध्ये बसून निघाली. त्यादिवशी कात्रज-कोंढवा रस्त्यावर आरोपीने एका विद्यार्थ्याला सोडण्यासाठी बस थांबवली. मुलीने मुलाला खाली उतरवले. ती बसच्या दरवाजाजवळ थांबली होती. त्या वेळी आरोपीने तिच्याशी अश्लील कृत्य केले. त्यानंतर पीडित मुलीला तु समोरच्या सीटवर येवून बस, असे आरोपी म्हणाला.
त्यावेळी घाबरलेली ही मुलगी बसच्या मागील सीटवर जाऊन बसली. घाबरलेल्या मुलीने याबाबत कोणाला काहीच सांगितले नव्हते. दोन-तीन दिवसानंतर पुन्हा स्कूल बसमधून घरी परत येत असताना, आरोपीने त्या मुलीला डोंगरावर चल असे म्हणत तिच्यासोबत विनयभंगाचा प्रयत्न केला. त्यानंतर (दि. 23 डिसेंबर) पीडित मुलीने तिचा मावसभाऊ शिवा नाईकवडे याला घडलेली सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर दोघेजण जाऊन कोंढवा पोलीस ठाण्यात जाऊन आरोपीविरुद्घ तक्रार नोंदवली.
याप्रकरणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपीला ताब्यात घेत अटक केली.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील करीत आहेत.