केडगाव / गणेश सुळ : दौंड तालुक्यातीलच नव्हे तर सगळ्या भागात सध्या पावसाची कमतरता आहे. ऑगस्ट महिना संपला तरी चांगला पाऊस नाही. पेरणी झालेल्या पिकांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी दौंड तालुक्यातील शेतकऱ्याच्या वतीने केली जात आहे.
काही ठिकाणी दुर्दैवाने भर पावसाळ्यात पाण्याचे टँकर सुरु आहेत. दुष्काळाची भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारने यात लक्ष देण्याची गरज आहे. ज्या पद्धतीने सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रम राबवत आहे. तसा कार्यक्रम सरकारने शेतकऱ्यांच्या दारात सुरु कराव, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असंही शेतकरी बोलत आहेत.
शेतकऱ्यांना आतापर्यंत २५ टक्के इन्शुरन्स मिळायला पाहिजे होता. तसंच मागच्या अतिवृष्टीची देखील मदत शेतकऱ्यांना मिळाली नाही. या सगळ्या स्थितीमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे राहणे गरजेचे आहे. पण सरकारकडून तसं दिसत नाही. हे सरकार शेतकऱ्यांशी असंवेदनशील आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत.
दरम्यान, राज्यात विविध पिकांच्या समस्या आहेत. त्याबाबत सरकार काही बोलत नाही. सरकार फक्त ‘शासन आपल्या दारी’ शो करत आहे. सरकारने अशा भयावह परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे असेही म्हटले जात आहे.
‘आई जेवू घाले ना आणि बाप भीक मागू देईना’, अशी स्थिती राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे. आम्ही कमी पाण्यावर येणारे बाजरी, मुगी अशी पिके घेतली आहेत. परंतु, ऑगस्ट महिना सरून देखील पावसाने पाठ फिरवली आहे. आमची पिके करपून चालली आहेत. पिके नष्ट झाली तर उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा आहे. सरकारने लवकरात लवकर उपाययोजना करण्याची गरज आहे.
–
अखिल बिचकुले, शेतकरी, यवत (कासूर्डी)