लोणी काळभोर : व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा संदेश देण्यासाठी साधु वासवानी कॉलेज ऑफ नर्सिंग, पुणे येथील तृतीय वर्ष बी.एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी (ता. 28) लोणी काळभोर (ता. हवेली) येथे ‘नशामुक्त भारत अभियानांतर्गत’ पथनाट्य आणि जनजागृती रॅलीचे आयोजन केले. या उपक्रमातून तंबाखू, मद्य आणि अमली पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या शारीरिक, मानसिक व सामाजिक दुष्परिणामांबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यात आली.

विद्यार्थ्यांनी प्रभावी पथनाट्याच्या माध्यमातून व्यसनामुळे व्यक्तीचे आरोग्य, कौटुंबिक जीवन आणि सामाजिक स्वास्थ्यावर होणारे विपरीत परिणाम अधोरेखित केले. तसेच जनजागृती रॅलीद्वारे नागरिकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आणि निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. नमिता पाठक, रुपाली शिंदे, शोभा पाटील, प्रियांका कदम, स्मिता पडळे आणि सिद्धी पिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
दरम्यान, या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक आरोग्याप्रती आपली बांधिलकी अधोरेखित करत व्यसनमुक्त आणि निरोगी समाजनिर्मितीचा संदेश दिला. ‘व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार!’ या घोषवाक्याद्वारे नशामुक्त भारताचा संकल्प अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला.








