चिन्सुराह : मनगट कापून आत्महत्या करण्याच्या प्रयत्नातील प्रमथेस घोषाल या युवकाला वाचवलं खरं. पण सोमवारी त्याला न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली आहे. त्याने वृद्ध वडील, आई आणि विवाहित बहिणीची आठ नोव्हेंबर २०२१ रोजी हत्या केली होती. कोरोनानंतर कमी झालेले उत्पन्न आणि कुटुंबीयांच्या गरजा भागवण्यात येणारे अपयश यामुळे स्वाभिमान दुखावल्याने आलेल्या नैराश्यातून त्याने हे कृत्य केले.
कोरोनामुळे जीवित आणि वित्तीय हानी तर मोठ्या प्रमाणात झालीच. त्याच्या झळा अजूनही समाजास बसत असल्याचे दुर्दैव यामुळे अधोरेखित झाले. चिन्सुराहचे सत्र न्यायाधीश संजयकुमार शर्मा यांनी हे तिहेरी खून म्हणजे दुर्मिळातील दुर्मीळ घटना असल्याचे नमूद केले होते. प्रमथेस हा मृदू भाषी आणि सभ्य अशी ओळख असणारा. तो आजूबाजूच्या मुलांची गणित आणि शास्त्र या विषयांची शिकवणी घेत असे.
त्यामुळेच साऱ्या मोहल्ल्यात त्याच्याविषयी एक आपुलकी होती. आई- वडील आणि विवाहानंतरही त्याच्याकडेच राहणारी बहीण असे त्याचे कुटुंब. एके दिवशी मुले नेहमीप्रमाणे शिकवणीसाठी आली. त्यांनी बंद असलेला दरवाजा बराच काळ ठोठावला. त्याचेळी रक्तबंबाळ झालेल्या प्रमथेसने हेलपाटत येऊन दार उघडले. त्याला पाहून विद्यार्थ्यांनी एकच आरडाओरडा केला. ते ऐकून शेजाऱ्यांनी पोलिसांना ही घटना कळवली.
तातडीने पोलिस आले. त्यांनी आधी प्रमथेसला दवाखान्यात दाखल केले. नंतर घराची पाहणी केली. त्यावेळी समोरचे चित्र पाहून तेही भांबावून गेले. कारण घरात शिर वेगळे केलेले तीन मृतदेह होते. या हत्या कोणी केल्या हे कळत नव्हते. तिघांवरही आधी डोक्यावर वार केले होते आणि नंतर डोके धडापासून कापले असल्याचे निष्पन्न झाले. सभ्य दिसणारा प्रमथेस असे काही करेल असे कोणालाच वाटत नव्हते. बरा झाल्यानंतर प्रमथेसकडे पोलिसांनी चौकशी केली.
त्यावेळी या भीषण घटनेचा उलगडा झाला. घरात सतत पैसे मागत असल्याने तिघांचा खून केल्याचे त्याने कबूल केले. कोरोनाच्या साथीनंतर पुरेसे पैसे मिळत नव्हते. नोकरीही मिळत नव्हती. त्यामुळे आपण या हत्या केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. खटला चालू झाला, त्यावेळी मात्र प्रथमेसने आपण निष्पाप असल्याचा दावा केला. पण, पोलिसांनी हा गुन्हा न्यायालयात शाबित होण्यासारखे पुरावे सादर केले. त्यामुळे न्यायालयाने त्याला फाशीची शिक्षा ठोठावली.