मुंबई : एसटी बँकेतील संचालक मंडळाने रोजच्या रोज लाखो रुपये गोळा करून कामगार भरती चालू केली आहे. कर्मचाऱ्यांना कर्ज मिळण्यास अडचण, लाभांश मिळण्यास अडचण, त्यामुळे या भ्रष्ट संचालकांवर तातडीने कारवाई व्हावी, यासाठी २७ डिसेंबरला महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेकडून पुणे स्टेशन सहकार आयुक्त कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, या मोर्चासाठी सहकार आयुक्त कार्यालयातून दबाव आणला जात असून संचालक मंडळ भ्रष्ट असल्याचे अनेक पुरावे असताना देखील कारवाई होत नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्या, अन्यथा स्वतःला पेटवून घेईन, असा संतप्त इशारा संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी दिला आहे.
भरती प्रक्रिया, कर्मचाऱ्यांना कर्ज देणे बंद करणे, बँकेतील भ्रष्टाचार परिणामी कर्मचाऱ्यांकडून कोट्यवधींच्या ठेवी काढून घेणे, यामुळे मधल्या काळात एसटी बँकेतील अनेक हेराफेरीच्या घटना उघडकीस आल्या होत्या. कर्मचाऱ्याच्या हितासाठी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची स्थापना करण्यात आली. ७० हजार सभासद असून बँकेची ४ हजार कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल आहे. जून २०२३ मध्ये या बँकेची निवडणूक पार पडली. यामध्ये अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे पॅनल विजयी झाले.
निवडणूक काळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असताना निवडणुकीनंतर सदावर्ते यांच्या नवनियुक्त संचालक मंडळाने काही निर्णय घेत कर्मचाऱ्यांच्या ठेवींना धोक्यात टाकले. हुकूमशाही पद्धतीने अनेक नियमांना केराची टोपली दाखवत बँकेचा मनमानी कारभार चालवण्यास सुरुवात केली. परिणामी, सामान्य एसटी कर्मचाऱ्यांना कर्जापासून, भरती प्रक्रियेपासून, ठेवींवर मिळणाऱ्या व्याजदरापासून वंचित राहावे लागल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.