रांची: झारखंडचा क्रिकेटपटू सौरभ तिवारीला कोणत्याही वेगळ्या ओळखीची गरज नाही. या फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या. खरंतर एक काळ असा होता की सौरभ तिवारीची तुलना महेंद्रसिंग धोनीशी केली जात होती. आयपीएलमध्ये धडाकेबाज कामगिरी केल्यानंतर सौरभ तिवारीला टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळाली, मात्र या फलंदाजाला मिळालेल्या संधीचे सोने करता आले नाही. आता सौरभ तिवारीने व्यावसायिक क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्यात रणजी ट्रॉफीमध्ये तो झारखंडकडून शेवटचा सामना खेळताना दिसणार आहे.
सौरभ तिवारीने 3 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ज्यामध्ये या फलंदाजाने 87.5 च्या स्ट्राइक रेटने 49 धावा केल्या. सौरभ तिवारीचा भारतासाठी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वोत्तम धावसंख्या ३७ धावा आहे. अशाप्रकारे सौरभ तिवारीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला गती मिळू शकली नाही, हे आकडेवारीवरून दिसून येते. मात्र, सौरभ तिवारीने आयपीएलमध्ये चांगलीच छाप पाडली. आयपीएलच्या 93 सामन्यांमध्ये सौरभ तिवारीने 120.1 च्या स्ट्राइक रेटने आणि 28.73 च्या सरासरीने 1494 धावा केल्या. आयपीएल 2011 च्या लिलावात सौरभ तिवारीला खूप महागात घेतले गेले होते. यापूर्वी सौरभ तिवारीने आयपीएल 2010 च्या मोसमात मुंबई इंडियन्ससाठी खूप धावा केल्या होत्या.