पुणे : भाजपचे विधान परिषद आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांची काही दिवसांपूर्वी अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने राज्यभर खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून त्यांची पत्नी मोहिनी वाघ यांना अटक केली. पोलिसांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. एका माहितीनुसार, सतीश वाघ यांचे हातपाय तोडण्याची सुपारी देण्यात आली होती. मात्र, एका गोष्टीने आरोपी गडबडले आणि त्यांनी सतीश वाघ यांना थेट संपवूनच टाकलं.
सतीश वाघ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी त्यांची पत्नी मोहिनी वाघला अटक केली. या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची आणि धक्कादायक माहिती समोर येत आहे. मागील अनेक वर्षांपासून वाघ पती-पत्नीमध्ये वाद होते. सतीश वाघ यांची देखील बाहेर अनैतिक संबंध असल्याचे त्यांच्या पत्नीने पोलिसांनी आपल्या कबुलीजबावात सांगितले आहे. तर मोहिनी वाघ यांचे देखील अक्षय जावळकर या शेजारीच राहणाऱ्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधाच्या मुद्यावरून दोघांमध्ये वाद होत असे. सतीश वाघ यांच्याकडून मोहिनी यांना मारहाण देखील होत असे.
‘या’साठी दिली होती सुपारी…
समोर आलेल्या माहितीनुसार, मारेकऱ्यांना फक्त हातपाय तोडण्यासाठी सुपारी देण्यात आली होती. पण अपहरण केल्यानंतर मारेकऱ्यांना सतीश वाघ हे भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा असल्याचे समजले. ही बाब समजताच मारेकरी बिथरले आणि त्यांनी कारवाईपासून वाचण्यासाठी वाघ यांना संपवून टाकलं. सतीश वाघ यांच्यावर 72 वार करण्यात आले होते. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला.
हातपाय तोडून अपंग करायचे होते..
सतीश वाघ यांचे अपहरण करून हात पाय तोडण्यासाठीच सुपारी देण्यात आली होती. हात पाय तुटल्यानंतर सतीश वाघ घरात बसतील. त्यानंतर सतीश वाघ यांची घरातच सुश्रुषा करता येईल. त्याशिवाय, घरातील सर्व आर्थिक व्यवहार आपल्या ताब्यात येतील, असा विचार म्हणून मोहिनी वाघने केल्याचे चौकशीत समोर आले आहे.