पुणे : भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात पुणे पोलिसांनी त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक केली असून ती सध्या पोलिस कोठडीत आहे. दरम्यान पोलीस चौकशीतून या प्रकरणात दररोज नवीन खुलासे समोर समोर येत आहेत. असं असताना आता या प्रकरणात आणखी एक चक्रावून टाकणारी माहिती समोर आली आहे. पहिल्यांदा सतीश वाघ यांचे फक्त हात पाय तोडण्याची सुपारी दिली होती. मात्र, आरोपींना जेव्हा सतीश वाघ हे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा आहेत असं समजलं त्यानंतर त्यांनी शरीरावर तब्बल ७२ वार करून निर्घृण खून केला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मागील अनेक वर्षांपासून सतीश वाघ आणि पत्नी मोहिनी वाघ यांच्यात सतत वाद होत असायचे. सतीश वाघ यांचे देखील बाहेर अनैतिक संबंध असल्याचे त्यांच्या पत्नीने सांगितले. तर मोहिनी वाघ यांचे देखील अक्षय जावळकर या शेजारीच राहणाऱ्या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. यावरून वाघ दांपत्यात सतत खटके उडायचे. सतीश वाघ हे पत्नीला मारहाण करायचे. तर घर खर्चासाठी पैसे देखील देत नव्हते. यावरून मोहिनी वाघ यांना राग यायचा. त्यामुळेच त्यांनी सतीश वाघ यांचा काटा काढण्याचं ठरवलं.
सुपारी फक्त हातपाय तोडण्याची
दरम्यान, प्रियकर अक्षय जावळकर याच्या मदतीने मोहिनी वाघ हिने पाच लाख रुपयांची सुपारी दिली होती. मात्र, ही सुपारी फक्त सतीश वाघ यांचे हातपाय तोडून त्यांना अपंग करण्याची होती. हात पाय तुटल्यानंतर तो घरात बसेल, त्यानंतर घरातील सर्व आर्थिक व्यवहार आपल्याकडे ताब्यात येतील. या हेतूने मोहिनी वाघ हिने सुपारी दिल्याचे चौकशीत समोर आले आहे. मात्र, ९ डिसेंबर रोजी पहाटे सतीश वाघ यांचे अपहरण झाले आणि त्यानंतर आरोपींना सतीश वाघ हे भाजप आमदारा योगेश टिळेकर यांचे मामा आहेत, असं समजलं. त्यानंतर मारेकऱ्यांनी सतीश वाघ यांच्यावर तब्बल ७२ वार करून त्यांची हत्या केली.
यापूर्वीही वाघ यांना ठार मारण्याची दिली होती सुपारी
दरम्यान, मोहिनी वाघ हिने यापूर्वीही एका व्यक्तीला सतीश वाघ यांना ठार मारण्यासाठी सुपारी देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, तो प्रयत्न अपयशी ठरला होता. त्यानंतर तिने अक्षय जवळकर यांच्या मदतीनेच संपूर्ण कट रचला आणि शेवटी सतीश वाघ यांना संपवलं. याप्रकरणी मोहिनी वाघ हिला पोलिसांनी अटक केली असून ३० डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात तिच्याकडे कसुन चौकशी सुरू असून दररोज धक्कादायक माहिती समोर येत आहे.