पुणे : पुण्यात भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचं अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती, त्या हत्येचा उलगडा करण्यात अखेर पुणे पोलिसांना यश आलं आहे. सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघने आरोपींना पाच लाखांची सुपारी देण्याची तयारी दाखवून त्यांची हत्या घडवून आणल्याचा धक्कादायक प्रकार पोलिस तपासात निष्पन्न झाला आहे. याप्रकरणी तिला पोलिसांनी बुधवारी अटक केली होती. दरम्यान पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. मोहिनी वाघने सतीश वाघ यांची सुपारी देण्यापूर्वी मोहिनीची आणखी एकाकडे विचारणा केल्याची माहिती आता समोर येत आहे.
सुपारी देण्यापूर्वी मोहिनीची आणखी एकाकडे विचारणा..
सतीश वाघ यांना जीवे मारण्याची सुपारी अक्षयला देण्यापूर्वी मोहिनी वाघने आणखी एका ओळखीच्या व्यक्तीकडे पतीचा खून करण्याबाबत विचारणा केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तसेच, मोहिनीबाबतचे संशयास्पद पुरावेही पोलिसांच्या हाती लागले आहेत. सतीश वाघ यांच्या सुपारीसाठी ठरलेल्या रकमेपैकी मोहिनेने काही रक्कम अक्षय जावळकरला दिल्याची माहिती होती, हे पैसे कशाप्रकारे देण्यात आले? यासह सतीश वाघ यांची हत्या करण्यामागे नेमकं आर्थिक कारण आहे की अन्य कोणतं कारण आहे?,याचा तपास देखील पोलिसांकडून केला जात आहे.
सहा महिन्यांपासून पतीला संपविण्याचे प्रयत्न..
हडपसरमधील शेतकरी, हॉटेल व्यावसायिक असलेले सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नी मोहिनी वाघ हिला बुधवारी (दि. 26) रात्री अटक करण्यात आली आहे. पत्नीनेच वाघ यांच्या हत्येची सुपारी दिल्याचे पोलिस तपासातून उघड झालं आहे. मोहिनीने अक्षय जावळकरच्या मदतीने सतीश वाघ यांची सुपारी देऊन त्यांची हत्या घडवून आणली. मोहिनी वाघची सहा महिन्यांपासून पतीला संपवण्यासाठीची तयारी सुरू होती. अक्षय बरोबरच्या अनैतिक संबंधाबद्दल पतीला समजले होते. त्यानंतर तिने अक्षयलाच पतीला मारण्याची सुपारी दिली. याप्रकरणात, मोहिनीच्या सांगण्यावर अक्षयने त्याच्या साथीदार आरोपींना वाघ यांना मारण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी दिलेली होती अशी माहिती या गुन्ह्याचे तपास अधिकारी पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे.
वाघ यांच्या हत्येनंतर हत्यार फेकलं भीमा नदीत..
सतीश वाघ यांच्या जीव घेण्यासाठी वापरले गेलेले हत्यार नवनाथ गुरसाळे व त्याचा साथीदार अतिश जाधव या दोघांनी मिळून पेरणे फाटा येथील भीमा नदीपात्रात टाकले, असल्याची माहिती मिळत आहे.
दोन आरोपींना 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी..
न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना सरकारी वकिलांनी, या प्रकरणाची सूत्रधार मोहिनी आणि इतर आरोपींनी नेमका कोणत्या कारणासाठी गुन्हा केला आहे? या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार नक्की कोण आहे? गुन्ह्यात वापरलेले हत्यार आरोपींनी नक्की कोठून आणलं होते? आरोपींचे आणखी कोणी साथीदार आहेत काय? याबाबत त्यांना एकत्रित करून सखोल तपास करायचा आहे. त्यामुळे आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, अशी मागणी केली. न्यायालयाने, आरोपींना 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.