पुणे : भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती. आता या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी वाघ यांनी पतीच्या हत्येसाठी 5 लाख रुपयांची सुपारी दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
संबंधित हत्या ही प्रेम प्रकरणातून झाली आहे. पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने या प्रकरणी सतीश वाघ यांच्या पत्नी मोहिनी हिला अटक केली आहे. सतीश यांची हत्या पत्नी मोहिनी हिनेच 5 लाख रुपयांची सुपारी देऊन केल्याचे तपासात समोर आले आहे. हत्येची सुपारी दिल्यानंतर मारेक-यांनी सतीश वाघ यांना 72 वेळा चाकूने भोसकलं. तसेच त्यांचा प्रायव्हेट पार्टही कापला. अनैतिक संबंधांतून ही हत्या करण्यात आल्याचा माहिती समोर आली आहे.
सतीश वाघ यांच्या प्रत्येक हालचालींवर आरोपींचे लक्ष होते. वाघ यांची सकाळपासून ते रात्रीपर्यंतची दिनचर्या याबद्दलची सगळी माहिती आरोपी अक्षय जवळकर याला माहिती होती. नेहमीप्रमाणे सतीश हे 9 डिसेंबर रोजी मॉर्निंग वॉकसाठी गेले असता त्यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली.
याप्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर सतीश वाघ हत्येप्रकरणी त्यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. शेजारी राहणा-या व्यक्तीसोबत मोहिनी यांचे प्रेम प्रकरण सुरु होते. यामध्ये सतीश वाघ अडथळा ठरत असल्याने पत्नी मोहिनीने त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला. याबाबतची कबुली मोहिनी वाघ हीने पोलीसांकडे दिली आहे.
दरम्यान, सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलीसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. मोहिनीने आपल्या पतीची हत्येची सुपारी अक्षय जवळकर याला दिली होती. पोलीसांनी या प्रकरणी पवनकुमार शर्मा, विकास शिंदे, अतिश जाधव आणि अक्षय जवळकर यांना यापूर्वीच अटक केली आहे.