अजित जगताप
म्हसवड : सातारा- पंढरपूर रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम सहा वर्षांपासून सुरू होते. त्यात आता दोन वर्षांपासून काम थांबले आहे. त्यामुळे रस्ता कधी होणार असा संतप्त सवाल वाहन चालक करू लागलेले आहेत. याबाबत सर्वसामान्य जनतेमध्ये नाराजी पसरले असून अभियंता सुनिल पोरे यांनी जनजागृती म्हणून म्हसवड परिसरात सार्वजनिक ठिकाणी फलक लावून जिल्हा प्रशासन व महामार्ग प्रशासनाला जाब विचारला आहे. या फलकाची जोरात चर्चा सुरू झाली आहे.
सातारा- पंढरपूर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत दिड हजार अपघात झालेले आहेत. काहींचा मृत्यू झाला तर काही जण कायमचचे जायबंदी झाले आहेत. सदर अपघाताचे कारण हे रस्त्याचे नूतनीकरणाचे काम असून काही ठिकाणी डोळ्यांमध्ये धुळ गेल्यामुळे वाहन चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याची घटना घडलेली आहे.
सदर बाब अनेकदा आंदोलनातून प्रकर्षाने जाणीव करून दिले आहे. तरीही अद्यापही कोणती सुधारणा न झाल्याने प्रजासत्ताक दिनी दि. २६ जानेवारी २०२३ रोजी वाहन चालक व काही म्हसवडकरांनी अभियंता सुनिल पोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्याची भूमिका घेतलेली आहे.
प्रत्येक वेळी आंदोलन केल्याशिवाय प्रश्न सुटत नाही. अशी ख्याती असलेल्या या भागात आता या रस्त्याच्या धुळीसाठी आंदोलनाची खरच गरज आहे का? जिल्हा प्रशासकीय अधिकारी व महामार्ग अधिकारी यांना धुळीचा त्रास होत नाही का? असे सवाल व्यक्त केला जात आहे.
म्हसवड नजिक देवस्थान व पर्यटन स्थळ असल्याने याठिकाणी अनेक भाविक व पंढरपूरच्या दिशेने शेकडो वाहने ये- जा करीत असतात. त्यांना धुळीचा त्रास जाणवू लागला आहे. रस्त्यावर काम करताना पाण्याचा शिडकावा होत नसल्याने धुळीचे कण थेट हॉटेल, खाद्य पदार्थ व सरबत तसेच फळ व्यापारी यांच्या मालावर पडतात.
त्यामुळे आरोग्यासाठी धुळीचे कण घातक ठरू लागले आहेत. विद्यार्थ्यांना पायी व सायकल तसेच दुचाकी वाहनातून ये जा करताना त्रास होत आहे. अनेकांनी श्वसनाचे रोग जडले आहेत.
सदर म्हसवड परिसरात रस्त्याचे काम करताना रस्त्यावर पाणी मारून रस्ता सुरळीत केल्यास आंदोलनाची गरज निर्माण होणार नाही असे अभियंता सुनिल पोरे, जेष्ठ पत्रकार पोपट बनसोडे, अहमद मुल्ला, महेश कांबळे, सलीम पटेल, बाबा बुरांडे, सुरेश डावखरे, दत्ता शिंदे, दत्ता डावखरे व वाहन चालकांनी सांगितले.
असेच आंदोलन दोन वर्षांपूर्वी पुराची वाया जाणाऱ्या पाण्यासाठी आंदोलन करून माण वासीयांना पाणी मिळवून दिले होते. आता पुन्हा एकदा धूळ घालविण्यासाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे. अशी माहिती अभियंता सुनिल पोरे यांनी दिली आहे.