अजित जगताप
Satara News वडूज : कोरोनाच्या संकटानंतर चिंतेचे वातावरण नष्ट झाले असून सर्वत्र उत्सव संचारलेला आहे. अनेक जण गुण्या गोविंदाने सर्व सण साजरे करीत आहेत. बाल चिमुकल्यांच्या आवडीचा सण म्हणजे रंगपंचमी यावेळी एकमेकांना रंग लावून सामाजिक एकजूट दाखवण्यात येते. वडूज नगरीत बाल चिमुकल्यांच्या रंगपंचमीला सर्व धर्मीय मुलांचा आगळावेगळा सहभाग घेतला होता.
वडूज तालुका खटाव या ठिकाणी आज दिवसभर बाल चिमुकल्या रंगपंचमी साजरी केली. विशेष म्हणजे पालक वर्गाने त्यासाठी नुसतीच परवानगी दिली नाही तर पिचकारी पासून रंग इतर साहित्य देऊन त्यांचा आनंद द्विगुणित केला. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक, कर्मवीर नगर, भागोदय नगर, विठ्ठल नगर,बाजार चौक,शेतकरी चौक, बाजार पटांगण, वाकेश्वर रस्ता, दत्त नगर,माधव नगर, खडकाचा मळा, भवानी नगर, मळवी, गणेश कॉलनी, छत्रपती संभाजी महाराज नगर,नाथ मंदिर परिसर, वडूज बस स्थानक परिसरात समर्थ नगर आदी भागात सकाळी सात वाजल्यापासून रंगाची उधळण करण्यात आली होती.
विविध रंगाचे फुगे तसेच रिकाम्या बाटल्यातून रंग भरून अनेकांनी रंगांची उधळण केली चेहऱ्याला विशिष्ट प्रकारचे रंग लावून रंगसंगती निर्माण केली होती त्यामुळे पालकांना सुद्धा आपल्याला आपल्या मुलांना ओळखणे अवघड झाले होते आनंदाची बाब म्हणजे महिला दिनाच्या नंतर झालेल्या या रंगपंचमी कार्यक्रमात महिला व युवतींचा सहभाग हा लक्षणीय होता.
द्वापरयुगात गोकुळात बालकुमार कृष्ण आपल्या गोपाळ सवंगड्यांवर पिचकारीने रंगीत पाणी उडवीत असे व उन्हाची तलखी कमी करीत असे. तीच प्रथा आजही रंगपंचमीच्या रूपाने दिसून आली आहे. मध्ययुगात कलावंत, संस्थानिक, राजे, राजवाडे हे होळी आणि रंगपंचमी सण साजरा करीत असत. राधा आणि कृष्ण यांनी या दिवशी एकत्र रंग खेळण्याचा आनंद घेतला अशी धारणा आहे.
फाल्गुन कृष्ण पंचमी या तिथीला रंगपंचमी हा सण येतो. धूलिवंदनापासून सुरू होणाऱ्या वसंतोत्सवाला रंगपंचमीच्या दिवशी पाच दिवस पूर्ण होतात. रंगपंचमी म्हणजे रंगांचा सण. या दिवशी एकमेकांना वेगवेगळे रंग लावून आनंदोत्सव साजरा केला जातो. कडक उन्हाळ्यापासून अंगाची दाह शांत व्हावी म्हणून रंग उधळले जातात.
यावेळी विविध रंगांची चूर्ण पाण्यात मिसळून ते पाणी पिचकाऱ्यामधून एकमेकांच्या अंगावर उडवले जाते. रंग उडविण्याचा उत्साह महाराष्ट्रात फाल्गुन पंचमीला साजरा केला जातो असे असले, तरी उत्तर भारत वगैरे ठिकाणी मात्र तो होळीच्या म्हणजेच फाल्गुन पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी साजरा केला जातो. रंग बेरंगी चेहरे पाहून अनेक विनोद सुध्दा घडले आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…
Vaduj News : वडुज येथे जन औषधी दिन, महिला दिन व मनसे वर्धापनदिन मोठ्या उत्साहात संपन्न