लोणी काळभोर : अवैधरीत्या गुटखा, पान मसाला, सुगंधीत तंबाखूची विक्री करण्यासाठी चाललेला एक ट्रक सासवड पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत पोलीसांनी ट्रकसह 98 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोघांना अटक केली आहे. हि कारवाई सासवड नारायणपुर मार्गावरील क-हाज स्वाद हॉटेल समोर सोमवारी (ता.21) दुपारी पावणेचार वाजण्याच्या सुमारास केली आहे.
कमलेश कुमार रामनरेश यादव (वय-41, मुळ रा. हरीकापुरा पोस्ट. कटारा ता. जेठवारा जि. प्रतापगड राज्य उत्तरप्रदेष सध्या रा. हडपसर ता. हवेली जि.पुणे) व रंजीतकुमार हरीश्चंद्र पटेल (वय 23 मुळ रा. हनुमान गंज पोस्ट कल्याणपुर ता. सोराव जि. इलाहबाद जि. उत्तरप्रदेश सध्या रा. हडपसर ता. हवेली जि.पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार जब्बार हारून सय्यद यांनी सरकारच्या वतीने सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस हवालदार जब्बार सय्यद हे सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी (ता.21) कर्त्यव्य बजावीत होते. सय्यद हे कर्त्यव्य बजावीत असताना, पोलीस नाईक गणेश पोटे यांना सासवड – नारायणपुर मार्गावरून बेकायदेशीरपणे गुटख्याची विक्री होणार आहे. अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी सासवड (ता. पुरंदर) येथील क-हाज स्वाद हॉटेल समोर सापळा रचून मोठ्या शिताफीने अशोक लेलॅन्ड कंपनीचा ट्रक पकडला.
पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता, ट्रकमध्ये केसर-युक्त विमल पान मसाला, सुगंधी तंबाखु, आणि “रजनिगंधा फ्लेवर्ड पान मसाला” असा 63 लाख 14 हजार 600 रुपये किंमतीचा गुटखा पानमसाला व 35 लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण 98 लाख 14 हजार 600 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर कमलेश कुमार व रंजीतकुमार पटेल यांच्यावर सासवड पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कायदा 2023 कलम 123, 223, 3(5), सह अन्न सुरक्षा मानके अधि 2006 व नियमन 2011 चे कलम 26 (2), 26(2) (a), 27(3) (d), 27 (3) (9), 49 प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
हि कामगिरी सासवड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार जब्बार सय्यद, लियाकतअजी मुजावर, दत्ता जाधव, पोलीस नाईक गणेश पोटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.
गुटखाकिंग लोणी काळभोरमधील असल्याचा संशय
मागील काही महिन्यांपासून लोणी काळभोरला दररोज गुटखा मागविला जात आहे. तसेच या गुटख्याची टपरी व दुकानांनी खुलेआम विक्री केली जात आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील मुख्य आरोपी हा लोणी काळभोर हद्दीतील असल्याची दाट शक्यता आहे. अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे.