सासवड : सासवड शहराच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टी तयार दारू चोरून विक्री करत असलेल्या ठिकाणी सासवड पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत १८ लिटर गावठी हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून दोघांना अटक करण्यात आली आहे. ऋषीकांत विजयानंद रासकर (वय 35 वर्षे, रा. खळद, रायकरमळा, ता. पुरंदर, जि. पुणे), विलास मनोहर खुडे (वय 41 वर्षे, रा. कुंभारवळण ता. पुरंदर, जि. पुणे) अशी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सासवड शहराचे हददीत नारायणपुर रोडचे कडेला गिरमेआळी येथील सार्वजनीक शौचालयाचे आडोशाला आणि कैकाडी आळी येथील पडक्या घराच्या आडोशाला बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टी तयार दारू चोरून विक्री करत असल्याची माहिती सासवड पोलिसांनी मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक ऋषिकेष अधिकारी यांनी छापा टाकण्यासाठी दोन वेगवेगळे पथके घटनास्थळावर रवाना केले.
त्यावेळी गावठी हातभट्टीची तयार दारूचे प्लास्टीकचे फुगे लोकांना चोरून विक्री करत असताना ऋषीकांत रासकर आणि विलास खुडे हे दोन व्यक्ती आढळून आले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. दरम्यान, ऋषीकांत रासकर याच्याकडून बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची तयार दारू भरलेले प्लास्टीकचे 940 रुपये किमतीचे 47 फुगे एकुण 9 लिटर 400 मिली दारू जप्त केली. तर विलास खुडे याच्याकडून बेकायदेशीरपणे गावठी हातभट्टीची तयार दारू भरलेले प्लास्टीक 900 रुपये किमितीचे 45 फुगे एकुण 9 लिटर दारू जप्त करण्यात आली असून दोघांवर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65(ख)(ड) प्रमाणे अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
ही कारवाई सहा.पोलीस निरीक्षक वैभव सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन चोरघे, पोलीस हवालदार जब्बार सय्यद, सुहास लाटणे, गणेश पोटे, पोलीस अंमलदार अक्षय चिले, सचिन किवळे यांनी केली.