पुणे : पुण्यातील वाघोलीतील केसनंद फाटा येथे फुटपाथवर झोपलेल्या नऊ जणांना डंपरने चिरडल्याची घटना रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सहा जणांवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकीकडे मृतांसाठी फोडलेला टाहो, तर दुसरीकडे जखमींसाठी नातेवाइकांची धावपळ पाहून ससून रुग्णालयातील कर्मचारी गहिवरून गेले.
ससूनमधील जखमींपैकी १९ वर्षीय तरुणीच्या पोटावरून डंपरचे चाक गेल्याने तिची प्रकृती गंभीर आहे. दुसऱ्या १८ वर्षीय युवतीच्या माकडहाडाला इजा झाली असल्याने तीही बऱ्यापैकी जखमी झाली आहे. तर उर्वरित चार जणांच्या पायाला, हाताला इजा झाली असली, तरी त्या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. जानकी पवार (वय १९), नागेश पवार वय (वय २० रा. मंगरूळ चावडा), रेनिशा पवार (वय १८) यांच्यावर शल्यचिकित्सा (सर्जरी) विभाग तर रोशन भोसले (वय ७), सुदर्शन वैराट (वय १८) आणि अलिशा पवार वय (वय ५०, रा. अमरावती) यांच्यावर अस्थिरोग (ऑर्थोपेडिक) विभागात उपचार सुरू आहेत. जानकी पवार (वय १९) हिला सोमवारी पहाटे तीन वाजता ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
महिलेचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी चार तास शर्थीचे प्रयत्न करत शस्त्रक्रिया करून श्वासपटल पुन्हा जोडले. सकाळी सात वाजता शस्त्रक्रियेची प्रक्रिया सुरू करण्यात आली. ही प्रक्रिया अकरा वाजता पूर्ण झाली. त्यानंतर पुढील उपचारांसाठी अतिदक्षता विभागात दाखल आले असून, व्हेंटिलेटरवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ. यल्लपा जाधव यांनी दिली.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन वर्षांचा वैभव पवार, एक वर्षाची वैभवी पवार आणि २२ वर्षीय विशाल पवार यांच्या मृतदेहांचे शवविच्छेदन सकाळी साडेसहा वाजता पूर्ण झाले होते. मात्र, जखमी आणि मृत हे एकाच कुटुंबातील असल्याने त्यांचे नातेवाईक हे जखमींकडे पाहणे, मृतदेहांचे मृत्यू पास घेणे यासाठी पळापळ करत होते. दुपारनंतर नातेवाइकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले, अशी माहिती ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी दिली
जखमींवर ससून रुग्णालयात उपचार
१९ वर्षांच्या जानकी पवार यांना छातीला मार लागला असून, त्यांना ऑपरेशन करून उपचार सुरू केले आहेत. अलिशा पवार या कामानिमित्त पुण्यात आल्या असून, त्यांना दोन्ही पायांना मुकामार लागला आहे. नागेश पवार यांना छातीला तसेच पोटात जखम व डाव्या हाताचे हाड तुटले आहे. रेनिशा पवार या वाघोली येथील रहिवासी असून, त्यांचे पेल्विस येथील हाड तुटले आहे आणि त्यामुळे त्या भागात रक्तस्त्राव होत आहे. रोशन भोसले हा अमरावतीचा रहिवासी असून, याचेदेखील उजव्या पायाचे हाड तुटले आहे. सुदर्शन वैराट हा संगमनेर येथील रहिवासी असून, त्याच्या उजव्या पायाचे हाड तुटले आहे. तर या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. वैभव पवार (वय २ वर्षे), वैभवी पवार (वय १ वर्ष), विशाल पवार (वय २२ वर्षे) असं अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.