बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्य ढवळून निघाले आहे. अशातच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यासह सुधीर सांगळेला शुक्रवारी (3 जानेवारी) पुण्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. याआधी जयराम चाटे, महेश केदार, प्रतिक घुले आणि विष्णू चाटे या चार आरोपींना पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यामुळे आता संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे.
दरम्यान, सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुलेला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अटक केलेला या प्रकरणातील आरोपी प्रतिक घुलेची एक जुनी पोस्ट सद्या व्हायरल होत आहे. महत्वाचं म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख यांची हत्या झाली होती. त्यादिवशीच प्रतिक घुलेने पोस्ट केली होती. ‘नाव खराब केल्याने नाव संपत नस्तय भुरट्या…बाप हा बापचं असतो #सुदर्शन भैय्या घुले #3333 #विरोधकांचा बाप’ अशी पोस्ट प्रतिक घुलेने केली होती. तसेच 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुखांचे अपहरण करण्यासाठी वापरण्यात आलेल्या काळ्या स्कॉर्पिओचा क्रमांक 333 आहे. हा निव्वळ योगायोग म्हणावा की या 3333 क्रमांकामागे नेमकं काय लपलंय? हे लवकरच पोलीस चौकशीतून समोर येणार आहे.
आरोपी सुदर्शन घुले नेमका कोण?
सुदर्शन घुले बीडमधील केजचा टाकळी गावचा रहिवाशी असून तो 27 वर्षांचा आहे. सुदर्शनचं इयत्ता सातवीपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या सुदर्शन हा ऊसतोड मुकादम म्हणून काम पाहत असे. तसेच उचल घेऊन कामाला न आलेल्या मजूरांकडून सुदर्शन वसुली सुद्धा करायचा. सुदर्शनची राजकारणात देखील चांगली ओळख असल्याचं सांगण्यात येत आहे. सुदर्शनवर 10 वर्षांत 10 गुन्हे दाखल आहेत. तर कृष्णा आंधळेवर 4 वर्षांमध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळत आहे. याचदरम्यान वाल्मिक कराड याचा खास असलेल्या विष्णू चाटे याच्यासोबत त्याची ओळख झाली. त्यातून त्याला पुढे काही कामं मिळत गेली. राजकीय नेते, पक्षाचे काम करणे, व्यवहार सांभाळणे अशा कामात तो हुशार असल्याचे गावकऱ्यांकडून सांगण्यात येते.