नाशिक : सप्तशृंगगडावरील घाटरस्ता भाविकांना दर्शनासाठी व पर्यटकांसाठी २४ डिसेंबर ते ५ जानेवारीपर्यंत २४ तास सुरळीतपणे सुरू राहणार आहे. या कालावधीत येणाऱ्या सर्व भाविकांना दर्शन घेणे सुलभ होणार आहे. यादरम्यान सप्तशृंगी मंदिर सकाळी ६ ते रात्री ९ पर्यंत दर्शनासाठी खुले असणार आहे. फॅनिक्युलर ट्रॉलीही भाविकांच्या सेवेत उपलब्ध असणार आहे.
रस्त्याला अडथळा ठरणारे सैल खडक व झुडपे काढण्यासाठी व डोंगरावरून घरंगळत येणारे दगड अडवण्यासाठी सुरू केलेले संरक्षक जाळ्या बसवण्याचे काम करण्यासाठी नांदुरी ते सप्तशृंगगड घाटरस्ता आठवड्यातून तीन दिवस ठरावीक कालावधीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. ६ जानेवारीपासून पुन्हा दुरुस्तीचे व सुरक्षेसाठी जाळ्या लावण्याचे काम सुरू करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने कळवण्यात आले असून ठरलेल्या दिवशी रस्ता सकाळी साडेसहा ते साडेअकरा या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे.
सप्तशृंगगड घाटरस्त्याचे संरक्षक जाळी बसवण्याचे काम ७० टक्के पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी ६, ८, ९ जानेवारी रोजी सप्तशृंगगड घाटरस्ता सकाळी साडेसहा ते साडेनऊ यावेळेत बंद राहणार आहे. त्यामुळे भाविकांनी सहकार्य करावे, असे आवाहन सहाय्यक अभियंता रोहिणी वसावे यांनी केले आहे. नाताळ आणि नववर्षादरम्यान ५ जानेवारीपर्यंत हजारो भाविक व पर्यटक सुट्ट्यांमुळे गडावर येत असतात. ही संभाव्य गर्दी लक्षात घेता रस्ता वाहतुकीस खुला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.