मुंबई : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाबाबत दररोज नवनवीन घडामोडी पुढे येत आहेत. देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. त्यापूर्वी देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर तपासाच्या अनुषंगाने धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखली केली होती.
याचिकेमध्ये काय?
बीडमधील राजकीय गुन्हेगारीला राजकीय वरदहस्त आहे. त्याला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे कारणीभूत आहेत. मुंडे मंत्रिपदावरून तत्काळ हटविण्यात यावे, त्यानंतरच या प्रकरणाचा तपास निष्पक्ष पद्धतीने होईल, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती.
वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्यात अत्यंत जवळचे संबंध आहेत, त्याबाबतचे पुरावेही म्हणून फोटोही देण्यात आले होते. तसेच, बीडमधील आमदारांनी विधानसभेत केलेल्या भाषणाचा संदर्भ देण्यात आलेला आहे. कराड आणि मुंडे एकमेकांना मदत करत असल्याचे पुरावेही न्यायालयात सादर करण्यात आले होते. तसेच वाल्मिक कराडवर संतोष देशमुख यांच्या खुनाचा गुन्हा दाखल करण्याचीही मागणी करण्यात आली होती.
मुंडे आणि कराड यांच्यातील लागेबंध पाहता अपहरण आणि खून प्रकरणाचा तपासात राजकीय दबाव नसावा म्हणून धनंजय मुंडे यांना मंत्रिपदावरून तूर्तास हटविण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. दरम्यान, औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आलेली याचिका संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी राज्य सरकारने एसआयटीची स्थापना केली आहे. तसेच, वाल्मिक कराड यालाही अटक करण्यात आली आहे, त्यामुळे या तपासावर आपण समाधानी आहोत, असे सांगून धनंजय देशमुख यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसा अर्ज देशमुख कुटुंबीयांनी वकिलाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.