सासवड: सर्वत्र लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha elections) प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. अशावेळी सत्तधारी विरोधक एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करणं सुरु आहे. सासवडमध्ये सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती तेव्हा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, बारामती लोकसभेची लढाई ही महाराष्ट्राच्या अस्तित्त्वाची लढाई आहे. गुजरातमधून कुणीही येतं आणि आमच्या पराभवासाठी ठाण मांडून बसतं. शरद पवार यांची दिल्लीला कायम भीती वाटत आली आहे. पण आम्ही सगळे सुप्रिया सुळेंच्या पाठिशी उभे आहोत, असे म्हणाले.
यावेळी संजय राऊत यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी, चंद्रकांत पाटील, अजित पवार ते एकनाथ शिंदे या सगळ्यांवर टीका केली. राऊतांनी या प्रचारसभेत जाहीरपणे भाजप नेते चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख ‘चंपा’, असा करत त्यांची खिल्ली उडवली. चंद्रकांत पाटील सांगतात की, बारामतीत आम्ही शरद पवारांना संपवण्यासाठी आलो आहोत. ‘आले किती, गेले किती, संपले भरारा, पण शरद पवार अजूनही तुमच्या नावाचा दरारा’, असे वाक्य राऊतांनी उच्चारताच शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.
देशाचे पंतप्रधान गेल्या दहा वर्षांपासून प्रत्येकवेळी खोटंच बोलतात. इतकं खोट बोलणारा पंतप्रधान देशाने कधीच पाहिला नव्हता. महाराष्ट्रातील स्वाभिमानी पक्ष फोडायचे आणि लूट गुजरातला न्यायची, हा उद्योग मोदी आणि शाह यांनी चांगलाच चालवला आहे. मोदी प्रचारसभेत खोटं बोलतात. त्यांनी मुस्लीम बांधवांविषयी बोलणे शोभते का?, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
मतदान करताना तुम्ही सर्वजण सुप्रिया सुळे यांच्या नावासमोरचं बटण दाबा. त्यावेळी चार जूनला दिल्लीत हार्ट अॅटक येईल. पंतप्रधान मोदी आता राहत नाही. हे मी गेल्या तीन वर्षांपासून सांगतोय, बोलताना असेही संजय राऊत यांनी म्हटले.