नागपूर : मंत्रीपद न मिळालेल्या काही नाराज आमदारांनी माध्यमांशी बोलत, काहींनी मौन बाळगत, तर काहींनी थेट पत्र लिहून आपली नाराजी बोलून दाखवली. सरकार स्थापन झाल्यानंतर रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राजभवनाच्या हिरवळीवर पार पडला. यात अनेक ज्येष्ठ मंत्र्यांना आणि आमदारांना बाजूला ठेवून पक्षश्रेष्ठींनी नव्या आमदारांना संधी दिली. तीनही पक्षांतील मातब्बर नेत्यांना बाजूला सारल्याने त्यांच्यात प्रचंड नाराजी आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार संजय कुटे यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. संबंधित कार्यकर्ते जाब विचारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी कूच करणार होते. पाच वेळा निवडून आले तरी कुटे यांना मंत्रीपद न मिळाल्याने जळगाव जामोद मतदारसंघातील कार्यकर्ते नाराज झाले. त्यामुळे कुटे यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून पत्र लिहिले. पक्षाचा आदेश अंतिम आहे, असे त्यात सांगितले. मतदारसंघातून मला सलग पाचवेळा निवडून दिले आहे. त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. माझे व्हिजन मी पूर्ण करणार. कुणी नाराज होऊ नये. आपण संघाचे स्वयंसेवक आहोत. त्याग, समर्पण आणि राष्ट्र प्रथम ही त्रिसूत्री आहे, असे सांगून त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे.