दौंड : कुसेगाव (ता.दौंड) येथील शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करणारे परिवर्तन चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते संजय गुलाब गायकवाड (वय-५१ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने सोमवारी( दि ७ रोजी )निधन झाले.
दौंड तालुक्यासह पुणे, सोलापूर,आहिल्यानगर, सातारा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारांच्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन घराघरात महापुरुषांचे विचार आणि कार्य पोहचविण्याचे काम संजय गायकवाड करत होते.पुरोगामी चळवळीतील प्रत्येक कार्यक्रमात त्यांचा पुढाकार असायचा कार्यकर्त्यांना त्यांनी नेहमीच पाठबळ दिला.परिवर्तन ग्रुपच्या माध्यमातून दौंड तालुक्यात विचारांची माणसे घडवली.
भारतीय बौद्ध महासभेचे ते दौंड तालुकाध्यक्ष होते.भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून बौद्ध धम्माचे काम केले असून ठिकठिकाणी श्रामणेर शिबीर,धार्मिक सहली तसेच विविध कार्यक्रम आयोजित केले.त्यांचा सामाजिक कार्याची दखल घेऊन अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात सन २०१५ साली तुळजापूर येथे राज्यस्तरीय महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार जेष्ठ साहित्यिक मोरेश्वर मेश्राम व माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.संजय गायकवाड यांच्या अंत्यविधीला दौंड, श्रीगोंदा, हवेली, इंदापूर, बारामती तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. क्रांतिकारक, छत्रपती शिवरायांचा मावळा,क्रांतिकारक विश्वरत्न भिमारायांच्या विचाराचा सच्चा योद्धा काळाच्या पडद्याआड गेल्याने परिवर्तन चळवळीची मोठी हानी झाल्याच्या भावना अनेक परिवर्तन वादी चळवळीच्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले एक मुलगी व वडील असा परिवार आहे. संजय गायकवाड यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.