पुणे : पुणे महानगरपालिकेतील घोटाळ्याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पुणे महापालिका हद्दीतील ३८ हजार विद्यार्थीनींना गेली दोन वर्षे सॅनिटरी नॅपकिन मिळालेच नाहीत. महापालिकेत सॅनिटरी नॅपकीनचा मोठा घोटाळा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. टेंडर देण्यासाठी महापालिकेच्या आधिकाऱ्यांवर भाजप नेत्यांचा दबाव असल्याचे काँग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. परिणामी सॅनिटरी नॅपकिन भाजपा आमदार-खासदार यांच्या टेंडरमध्येच अडकल्याचा आरोप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
पुणे महापालिका हद्दीतील मुलींना महापालिकेतर्फे सॅनिटरी नॅपकिन वाटप करण्यात येते. मात्र, टेंडरच्या वादामुळे गेल्या दोन वर्षांपासून मुलांना सॅनिटरी नॅपकिन मिळालेले नाहीत. यामुळे विद्यार्थिनींना मनस्ताप सहन करावा लागत आहे. मात्र, भाजपचे खासदार, आमदार यांच्यात टक्केवारीवरून वाद सुरू आहेत. टेंडर देण्यासाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर भाजप नेत्यांचा दबाव असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
महापालिका आयुक्त कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत? जर दबावाखाली काम करत असतील तर त्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, असेही काँग्रेसने सुनावले आहे. दरम्यान, शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे आणि पुण्यातील कॅन्टोमेंटचे भाजप आमदार सुनील कांबळे याचा टेंडरवरून वाद सुरू आहे. पैसे खाण्यावरून त्यांच्यात भांडण सुरू असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या प्रकरणाची दखल घेण्यात यावी तसेच कारवाई करण्यात यावी यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या प्रकरणी वेळेवर कारवाई न झाल्यास काँग्रेस महापालिकेत जाऊन तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही त्यांनी दिला.