मुंबई: भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. 27 जुलैपासून टी-20 मालिका सुरू होणार आहे आणि त्याआधी श्रीलंकेचे मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांनी एक मोठी रणनीती अवलंबली आहे. जयसूर्याने श्रीलंकेच्या संघात आयपीएलमध्ये संजू सॅमसनसोबत सावलीप्रमाणे असलेल्या एका खास व्यक्तीचा समावेश केला आहे. श्रीलंकेच्या अंतरिम प्रशिक्षकाने खुलासा केला आहे की, आयपीएल संघ राजस्थान रॉयल्सचे हाय परफॉर्मन्स डायरेक्टर जुबिन भरूचा यांनी टी20 मालिकेच्या तयारीसाठी आपल्या फलंदाजांना मदत केली आहे.
जुबिन भरूचा यांनी काय केले?
जयसूर्याने सांगितले की, ‘श्रीलंका संघ व्यवस्थापनाने जुबिनला राजस्थान रॉयल्समधून आणले आणि त्याने श्रीलंकेच्या फलंदाजांसोबत 6 दिवस काम केले.’ लंका प्रीमियर लीगमध्ये खेळल्यानंतर इतर क्रिकेटपटूही सामील झाले. जयसूर्याने आशा व्यक्त केली की, खेळाडूंनी जुबिनकडून नवीन टेक्निक्स शिकल्या असतील. जुबिन भरूचा ही अशी व्यक्ती आहे, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली राजस्थान रॉयल्स निर्भयपणे खेळला आहे. कर्णधार संजू सॅमसन, यशस्वी जैस्वाल, रायन पराग या सर्वांनी चांगली कामगिरी केली आहे आणि तिघांचाही T20 संघात समावेश आहे.
विराट-रोहितच्या निवृत्तीचा फायदा घेणार!
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी टी-20 क्रिकेटला अलविदा केला आहे. सनथ जयसूर्याने सांगितले की, श्रीलंका संघ याचा फायदा घेणार आहे. जयसूर्या म्हणाला, ‘रोहित शर्मा आणि विराट कोहली हे जगातील सर्वोत्तम खेळाडू आहेत. त्यांची प्रतिभा आणि ते ज्या प्रकारचा क्रिकेट खेळले आहेत, हे आम्हाला माहित आहे. तसेच जडेजाचे संघात काय स्थान आहे, हे आपल्या सर्वांना माहित आहे. त्यांची अनुपस्थिती भारतीय संघासाठी तोट्याची गोष्ट आहे आणि आम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. मात्र, टी-20 मालिकेपूर्वी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. गोलंदाज दुष्मंथा चमीरा दुखापतीमुळे टी-20 मालिकेतून बाहेर पडला आहे.