लोणी काळभोर : जगेन तर देशासाठी, आणि मरेन तर देशासाठीच, या प्रेरणेने लहुजी वस्ताद साळवे यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशसेवेसाठी अर्पण केले. तसेच इंग्रजांविरूद्ध लढण्यासाठी सशस्त्र क्रांतीची मशाल युवकांच्या मनात पेटवत, त्यांनी अनेक क्रांतिकारक घडवले आहेत.
क्रांतीच्या लढ्याला नवा आयाम देणारे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे आहेत, असे मत हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर यांनी मांडले.
स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि क्रांतीचे बीजारोपण करणारे आद्य क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या २२८ व्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी (ता.१४) अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी पंचायत समिती सदस्य मल्हारी कोळपे, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच भारती राजाराम काळभोर, ग्रा.पं. सदस्य राजाराम काळभोर, योगेश काळभोर, नागेश काळभोर, गणेश कांबळे, अमित काळभोर, सचिन काळभोर, महेश फलटणकर (पत्रकार), संजय राखपसरे, ग्रामविकास अधिकारी जे.एच. बोरावणे व ग्रामपंचायत कर्मचारी वृंद उपस्थित होते.