पुणे, ता. 6 : मोबाईल दुकानातून सेल्स एक्झीक्युटीव्हने 4 लाखांहून अधिक मोबाईलची परस्पर विक्री करून अपहार केल्याची घटना घडली होती. ही घटना पुण्यातील कॅम्प परिसरात घडली होती. गेल्या एक महिन्यापासून पोलिसांना चकवा देणाऱ्या आरोपीला बंडगार्डन पोलिसांनी रविवारी (ता.5) अटक केली आहे.
श्रीपाल नेमिचंद चोरिया (वय 43 रा. इशा पर्ल सोसायटी, डी विग, फ्लॅट नं. 1001, कोंढवा, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी मोबाईल दुकानाचे मालक विपकमल गुरमित सेहगल (वय 48, रा. टी-13 फ्लॅट नं. 002, रहेजा विस्टा प्रिमियर, मोहम्मदवाडी, पुणे) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विपकमल सेहगल हे एक व्यावसायिक असून त्यांचे कॅम्प परिसरात मोबाईल अॅण्ड अॅक्सेसरिज डिस्ट्रीब्यूटर्स नावाने दुकान आहे. या दुकानातून पुणे शहर व महाराष्ट्रातील विविध शहरांत मोबाईल फोन व अॅक्सेसरीजचे वितरण केले जाते. सेहगल यांच्या दुकानात 17 जण काम करतात. तर आरोपी श्रीपाल चोरिया हा त्यांच्याकडे सेल्स एक्झीक्युटीव्ह म्हणून काम करीत होता.
दरम्यान, आरोपी श्रीपाल चोरिया याने वेगवेगळ्या डिलर्सकडून ऑनलाईन अथवा रोख स्वरुपात पैसे स्वतःकडे घेतले. तसेच काही मोबाईल हँडसेट परस्पर मार्केटमध्ये विकले. आरोपीने मोबाईल अॅक्सेसरीज, इतर इलेक्ट्रॉनिक वास्तू, फिचर फोनपैकी काही साहित्य डिलर्सकडून घेऊन त्याच्याकडेच ठेवले किंवा मार्केटमध्ये इतरत्र त्याची विक्री केली. सदर प्रकार हा 22 ऑगस्ट 2024 रोजी उघडकीस आला. सेहगल यांनी याबाबत चोरिया याला विचारले असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली व यापुढे कामावर येणार नाही. तसेच भेटण्यासाठी सुद्धा येणार नाही, असे सांगून फोन ठेवून दिला.
विपकमल सेहगल यांनी विविध डिलर्सकडून अधिक माहिती घेतली असता, आरोपी श्रीपाल चोरिया याने 4 लाख 22 हजार 985 रुपयांचा माल गायब केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी सेहगल यांनी आरोपी श्रीपाल चोरिया याच्या विरोधात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी मागील एक महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत होता. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीची माहिती काढून मोठ्या शिताफीने रविवारी अटक केली आहे.