पुणे : सहकार भारती या संस्थेचे महाराष्ट्र प्रदेशचे साखर कारखाना प्रकोष्ठ प्रमुख म्हणून साखर ऊद्योगाचे अभ्यासक साहेबराव खामकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहकार भारतीच्या शिर्डी येथे पार पडलेल्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये त्यांची नियुक्तीची घोषणा करण्यात आली.
निवडीनंतर बोलताना साहेबराव खामकर म्हणाले की, सहकार भारती ही संस्था सहकार क्षेत्राच्या उत्थानासाठी समर्पित संघटना असून सन १९७८ मध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली. सहकार हा ख-या अर्थाने यशस्वी व कार्यान्वित करायचा असेल तर त्यातील काम करणारे सर्व लहान थोर हे सर्वच कार्यकर्ते समाजसेवी वृत्तीचे असले पाहिजेत म्हणून सहकार भारतीने ‘बिना सहकार-नही ऊध्दार ‘ या सहकार चळवळीचे ध्येय वाक्याला ‘बिना संस्कार- नही सहकार ‘ अशी अर्थपुर्ण जोड दिली व आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली आहे.
सद्या देशभरातील ५०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये सहकार भारतीचे कार्य अत्यंत प्रभावीपणे चालू असून सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांचे व बॅंकांचे प्रश्न नियमितपणे सोडविले जात आहेत, असेही खामकर यांनी सांगितले.
तसेच या संस्थेच्या माध्यमातून राज्यातील साखर कारखान्यांचे संचालक मंडळ, अधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी व सबंधित सर्व घटकांना वेळोवेळी कार्यशाळा, प्रशिक्षण, व्याख्याने आयोजित करून मार्गदर्शन केले जाईल, अशी माहितीही त्यांच्याकडून देण्यात आली. साहेबराव खामकर यांच्या निवडीबद्दल सहकार भारतीचे प्रदेश महामंत्री विवेक जुगादे, प्रदेश सहकोषाध्यक्ष औदुंबर नाईक व पुणे विभाग प्रमुख गिरीश भवाळकर यांनी त्यांचे अभिनंदन केले.