लातूर : लातूरमधून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. या अपघातामध्ये दोन मित्रांचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे. परदेशात जाऊन नोकरी करण्याचं या तरुणांचं स्वप्न आता अपूर्ण राहिलं आहे. ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या भीषण अपघातामध्ये या तरुणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुळात आहे. लातूरच्या घोणसी-गुडसूर मार्गावर ही घटना घडली असून या अपघाताचा तपास लातूर पोलिसांकडून सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरच्या जळकोट तालुक्यातील मेवापूर येथे राहणारे दोन मित्र नोकरीसाठी सौदी अरेबियात जाणार होते. परदेशामध्ये नोकरी मिळावी यासाठी त्यांचे गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते. परदेशामध्ये जाण्यासाठी त्यांच्याकडे पासपोर्ट नव्हते. हेच पासपोर्ट काढण्यासाठी दोघेही शनिवारी लातूरच्या पासपोर्ट कार्यालयात गेले असल्याची माहिती समोर आली आहे.
घरी परत येत असताना काळाचा घाला..
पासपोर्ट काढून घरी परत येत असताना या तरुणांवर काळाने घाला घातला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दुचाकीवरून ते घरी जात होते. अशातच घोणसी ते गुडसूर मार्गावर ट्रॅक्टरला त्यांच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातामध्ये दोन्ही तरुण गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तात्काळ या दोन्ही तरुणांना उपचारासाठी उदगीरच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषीत केले. सुनील राठोड आणि भरत गोपनर असं या मृत तरुणांची नावं असून या अपघाताचा तपास लातूर पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.