पुणे : रुपयाच्या घसरणीमुळे संगणक, लॅपटॉप, मोबाईल फोन, खाद्यतेल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किमती वाढू शकतात. बहुतांश इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गॅझेट विदेशातून आयात केले जातात. अशा परिस्थितीत रुपयाच्या कमकुवतपणामुळे जास्त किंमत मोजावी लागू शकते.
डिसेंबर 2014 पासून डॉलरच्या तुलनेत रुपया 25 टक्क्यांनी घसरला आहे. मंगळवारी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे रुपयाने डॉलरमागे 80 रुपयांची पातळीही ओलांडली आहे. अशा स्थितीत रुपयाच्या या घसरणीचा सर्वसामान्यांच्या जीवनावर कसा परिणाम होणार आहे, याचे आकलन होणे आवश्यक आहे.
एकंदरीत रुपयाची कमजोरी जसजशी वाढत जाईल तसतसा सर्वसामान्यांचा त्रासही वाढणार आहे. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपला देश अनेक गोष्टींसाठी आयातीवर अवलंबून आहे. बहुतेक आयात-निर्यात फक्त अमेरिकन डॉलरमध्येच होते, त्यामुळे बाहेरील देशांतून कोणतीही वस्तू खरेदी करायची असेल तर खूप रुपये खर्च करावे लागतील. अशा परिस्थितीत देशात पेट्रोल, डिझेलसह इतर आयात माल महाग होणार आहे.
संगणक, मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू महाग होऊ शकतात रुपयाच्या कमजोरीमुळे संगणक, लॅपटॉप, मोबाईल फोन, खाद्यतेल आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर परिणाम होऊ शकतो. बहुतांश इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गॅझेट विदेशातून आयात केले जातात.
त्यामुळे, रुपयाच्या कमकुवतपणामुळे त्यांच्या किंमती वाढू शकतात, कारण आयातदारांना समान किंमत आणि प्रमाणासाठी अधिक पैसे द्यावे लागतील.
रुपयाच्या घसरणीमुळे परदेशात शिक्षण घेणेही महागात पडू शकते. रुपयाच्या घसरणीचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुम्हाला प्रत्येक डॉलरसाठी अधिक रुपये मोजावे लागतील. यामुळे परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा खर्च नक्कीच वाढेल.
परदेशात पर्यटन महाग :
जर तुम्ही व्यवसायासाठी किंवा सुट्टीसाठी परदेशात जाण्याचा विचार करत असाल तर कमकुवत रुपयामुळे तुमच्यासाठी तो महागडा सौदा ठरू शकतो. जसजसा रुपया कमकुवत होईल आणि खाली येईल तसतसा तुमचा परदेश प्रवास महाग होईल. जर तुम्ही तुमच्या परदेश प्रवासाचे नियोजन ₹70 प्रति डॉलर या पातळीवर केले असेल, तर रुपया प्रति डॉलर ₹80 झाल्यामुळे तुमचा खर्चही सुमारे 15 टक्क्यांनी वाढेल. जसजसे रुपयाचे मूल्य घसरते, तसतशी देशाची आयातही महाग होते, त्यामुळे देशाची परकीय व्यापार तूटही वाढते.
रुपयाच्या घसरणीचा फायदा या लोकांना :
रुपयातील घसरण ही प्रत्येकासाठी तोट्याची नसते. याचा फायदा निर्यातदारांना होणार आहे. कारण परदेशात वस्तू विकून डॉलरचे उत्पन्न मिळते आणि जसजसा रुपया घसरतो तसतसा त्यांना त्यांच्या उत्पादनाची जास्त किंमत मिळते. आयटी आणि फार्मा कंपन्यांना रुपयाच्या घसरणीचा फायदा होईल कारण ते त्यांची उत्पादनेही मोठ्या प्रमाणात निर्यात करतात. त्यांचे बहुतेक उत्पन्न फक्त डॉलरमध्ये आहे.
डॉलरच्या तुलनेत रुपया का?
जागतिक चलन बाजारातील बहुतेक चलनांची तुलना डॉलरशी केली जाते. डॉलरच्या तुलनेत देशाच्या चलनाचे मूल्य चर्चेत राहिल्याचे आपण अनेकदा पाहतो. आपल्या देशातही रुपयाच्या चढउताराची तुलना डॉलरशीच केली जाते.
गेल्या काही महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य मोठ्या प्रमाणात घसरले आहे. पण, रुपयाची तुलना डॉलरशीच का होते? या प्रश्नाचे उत्तर दुसऱ्या महायुद्धातील ‘ब्रेटन वूड्स करारात’ दडलेले आहे. या करारात तटस्थ जागतिक चलन निर्माण करण्याचा प्रस्ताव होता.
त्यावेळी युद्धग्रस्त जगात अमेरिका आर्थिकदृष्ट्या मजबूत झाली होती. अशा परिस्थितीत अमेरिकन डॉलर हे जगाचे राखीव चलन म्हणून निवडले गेले आणि डॉलरचा वापर संपूर्ण जगाच्या चलनासाठी पॅरामीटर म्हणून केला गेला.