पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) प्रवेशाची नव्याने प्रवेश प्रक्रिया ही मंगळवारी (ता.14 मे) पासून सुरु केली जाणार आहे. यासाठी नव्याने आदेश जारी केले असून यासाठीची तयारी शिक्षण विभागाकडून करण्यात येत आहे.
या प्रवेश प्रक्रियेत सरकारी, अनुदानितच्या सर्व शाळांना वगळले जाणार आहे. फक्त खासगी शाळांमध्येच प्रवेश केले जाणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकारी सूत्रांकडून देण्यात आली आहे. तसेच 14 मे नंतर 15 दिवसांत प्रवेश प्रक्रिया आटोपून घेतली जाणार आहे.
शाळा सुरु होण्यापूर्वीच आरटीईचे प्रवेश पूर्ण करुन संबंधित विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्या दिवशीच आरटीईतून प्रवेश मिळून ते शाळेत दाखल होतील, यासाठीचे नियोजन केले जाणार असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली आहे.
आरटीईच्या नवीन प्रवेश प्रक्रियेत सर्वच पालकांना नव्याने ऑनलाईन अर्ज करावे लागतील. मागील वर्षी ज्या शाळांची नोंदणी ही आरटीई प्रवेशासाठी करण्यात आली होती, त्या शाळांमध्ये हे प्रवेश केले जातील. तसेच सरकारी, अनुदानित शाळा वगळल्याने प्रवेशासाठी राज्यभरात उपलब्ध असलेल्या 9 लाख 56 हजारांपैकी फक्त खासगी शाळांतील एक लाखांच्या दरम्यान जागा उपलब्ध असणार आहेत.