लोणी काळभोर : पुणे – सोलापूर महामार्गावर लाईट कटिंग बॅरियर्स तुटल्याने रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता वाढली आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी होणारे अपघात टाळण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी तुटलेले लाईट कटिंग बॅरियर्स तातडीने बसवावेत, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक नागरिक करीत आहेत. तसेच महामार्गावरील गावात सूरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना नसल्याने अपघाताच्या संख्येत वाढ होताना दिसून येत असल्याचे नागरिक बोलत आहेत.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाका ते कासुर्डी (ता. दौंड) या दरम्यानच्या रस्त्याचे काम आयआरबी कंपनीकडे होते. टोलनाका मागील तीन वर्षापूर्वी बंद झाल्याने वाहनांचा उजेड रोखण्यासाठी या रस्त्यावर १५ फुटांच्या अंतरावर लाईट कटिंग बॅरियर्स बसविले होते.
मात्र हे लाईट कटिंग बॅरियर्स तुटल्याने लाईट कटिंग बॅरियर्समुळे समोरून आलेल्या वाहनांचा उजेड थेट विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहण चालकांच्या डोळ्यावर पडतो आहे. त्यामुळे वाहन चालकांना समोरील वाहने दिसत नाहीत.
तसेच अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी महामार्ग ओलांडणारे पादचारी व्यक्तीदेखील दिसत नाहीत. परिणामी पादचारी व्यक्ती किंवा वाहने अचानक समोर दिसताच वाहनचालक गडबडून जातात व अपघाताची शक्यता वाढते.
दरम्यान, महामार्गावरील टोल बंद झाल्यापासून एनएचएआयच्या विभागाकडे हस्तांतरित झाल्यानंतर महामार्गावरील सुविधा होतील अशा अपेक्षा येथील नागरिकांना होती. मात्र प्रत्यक्षात जागोजागी रस्त्याच्या कडेच्या जाळ्या तुटलेल्या अवस्थेत आहेत, रस्त्याच्या कडेला झाडे उगवलेली आहेत.
रस्त्याच्या दुतर्फा मातीचे मोठमोठे ढीग साचले आहेत. महामार्गावरून जाणाऱ्या वाळूच्या ट्रक मधून पडणारी वाळू या वाळूमुळे दुचाकीवर घसरून पडण्याचे प्रकार वाढत चालले आहे. याचा नाहक त्रास वाहनाचालक, दुचाकीस्वरांना व पायी चालणाऱ्या नागरिकांना होत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वेगवेगळी काटेरी झाडेही उगवलेली आहेत.
याबाबत भाजपाचे पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप म्हणाले, “महामार्गाच्या कडेच्या संरक्षक जाळ्या तुटून सर्विस रोड वरती लोंबत असल्याने वारंवार अपघात होत आहेत. त्याची दुरुस्ती लवकरात लवकर करण्यात यावी.
तसेच महामार्गाच्या दोन्ही बाजूला माती व वाळूचे थर साचले असून यावरून दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे महामार्गाची त्वरित स्वच्छता करण्यात यावी. महामार्गाच्या दुभाजकावर बसविण्यात आलेल्या रिफ्लेक्टर्सच्या पट्ट्या त्वरित बसविण्यात याव्या तसेच लाईट कटिंग बॅरियर्स तुटलेल्या ठिकाणी नवीन बसविण्यात यावे.”