लोणी काळभोर: पुणे शहरालगतच्या एका सधन तालुक्यात पतसंस्थांना मालमत्तेचा ताबा घेण्यासाठीच्या आदेशाचे पत्र मिळवण्यासाठी पैसे मोजावे लागत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कर्जापोटी तारण असलेल्या मालमत्तेचा ताबा घेण्यासाठी तहसीलदार यांच्या आदेशाचे पत्र आवश्यक असते. याच पत्रासाठी एका मामलेदार कचेरीत पैसे मोजावे लागत आहे. याकामी तहसील कार्यालयातील एका ”देवदास”ने वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाखाली पंधरा हजार रुपयांची ”चव धर’त आपला वसुलीचा धंदा जोरात चालवला आहे.
याबाबतची आपबिती पतसंस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने पतसंस्थेचे नाव न छापण्याच्या अटीवर “पुणे प्राईम न्यूज” ला दिली आहे. तालुक्यातील जनता न्याय निवाड्याच्या निर्णयासाठी तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्या न्यायालयात येत असते. मात्र, नागरिकांसह वित्तीय संस्था, पतसंस्था व सहकारी बँकवाले महसूलमधील या ‘देवदास’ रुपी नंदीला जाम वैतागले आहेत. न्याय मंदिरातील मामलेदारच्या सहीच्या दर्शनासाठी पंधरा हजार रुपयांचा बाजार सहभागी क्लार्कने मांडला आहे. उघडपणे ताबा आदेशासाठी पैसे मागत असल्याचा गंभीर प्रकार पतसंस्था चालकांनी उघड केला आहे. यामुळे संबंधित तालुक्याचे तहसील कार्यालय बदनाम होऊ लागले आहे.
पंधरा हजार रुपये दिले, तरच वसुलीच्या दाखल्यावर तहसीलदार सही करतात. अन्यथा तुमचे प्रकरण धूळखात पडेल, असा उपदेश वजा डोसही संबंधित कर्मचारी देत आहे. त्याच्या डोसमुळे तहसीलदारही या गंभीर प्रकारात सहभागी असल्याची शंका पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
संबंधित क्लार्क वरिष्ठ अधिकाऱ्याच्या नावाखाली खुलेआम पैसे मागत आहे. शासकीय लोकसेवक कर्तव्याच्या नावाखाली नागरिकांची लूट करु लागला आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकारी कितपत सहमत अथवा सहभागी आहेत हा जनतेच्या नजरेतून संशोधनाचा विषय आहे. मात्र, जप्तीचे व ताबा आदेश अखत्यारीत फौजदारी टेबलची धुरा सांभाळणाऱ्या ‘देवदास’ने अवैध मार्गाने वेगात चालवलेल्या गाडीला वरिष्ठ अधिकारी ब्रेक लावणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
कर्ज थकबाकी प्रकरणी जप्ती आदेश प्रक्रियेसाठी पतसंस्थांना वेठीस ठेवणे, त्यांच्याकडून अवैधपणे पैसे उकळणे, याकामी सहभागी असलेल्या कर्मचारी व अधिकाऱ्यावर पुणे जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी काय ॲक्शन घेणार? कायदा, शिस्त व सेवा हमी याबाबत कोणता संदेश देणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.