हनुमंत चिकणे
उरुळी कांचन, (पुणे) : नायगाव (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मुळा – मुठा नदी पात्रात बेकायदेशीररित्या वाळू उत्खननाच्या ठिकाणी महसूल विभागाने सोमवारी (ता. २१) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास धडक कारवाई केली आहे. या कारवाईबाबत पूर्व हवेलीत एकच खळबळ उडाली असून वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.
हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते पाटील यांना नायगाव, पेठ सीमेवर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळू उपसा होत असल्याची गोपिनीय माहिती मिळाली होती.
या माहितीची खातरजमा करण्यासाठी उरुळी कांचनच्या मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोमवारी संध्याकाळी छापा टाकला. यावेळी वाळू उपसा करताना एक पोकलेन मशीन मिळून आले आहे. तर त्याचा चालक मशीन सोडून पळून गेला.
नायगाव येथे सदर नदीचे पात्र तीन किलोमीटरपर्यंत आडवून त्यावर रस्ता तयार करून तीन-चार फुट उकरून वाळू उपसा केला जात होता. नूरजहाँ सय्यद यांनी पाच दिवसांपुर्वी सदर गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन रॅम्प काढून टाकला होता.
परंतू वाळु माफीयांनी उपसा करण्यासाठी पुन्हा रस्ता करून पोकलेन मशिनरीच्या साह्याने वाळु उपसा चालू केला. सोमवारी रात्री अचानकपणे दाखल झालेल्या पथकामुळे वाळु माफीयांची पळापळ झाली व मशिन सोडून पळून गेले.
महसूल विभागाने केलेल्या या कारवाई बाबत पूर्व हवेलीत एकच खळबळ उडाली आहे. महसूल विभाग कोणत्याही दबावाला बळी न पडता मोठी कारवाई केल्याने पूर्व हवेलीतून महसूल विभागाचे कौतुक नागरिक करीत आहेत.
दरम्यान, या कारवाईत पोकलेन मशीन जप्त करून पुढील कार्यवाहीसाठी नायगावचे पोलिस पाटील दत्तात्रय चौधरी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
नूरजहाँ सय्यद यांनी स्थानिक नागरिकांकडून अधिक माहिती घेतली असता सदरचे मशीन हे वाळू उपसा करण्यासाठी कैलास साहेबराव चौधरी व बाळासाहेब लक्ष्मण कटके यांनी आणले होते. तसेच दोन्ही इसम वाळू काढत असल्याचे समजल्याची माहिती उरुळी कांचनच्या मंडळाधिकारी सय्यद यांनी दिली.