अजित जगताप
सातारा : पहिल्या प्रजासत्ताक दिनाच्या नंतर दोन वर्षाने जन्म झालेले खटावचे सेवानिवृत्त तहसीलदार विलास गडांकुश आहेत. त्यांनी किडनी आजाराने त्रस्त असूनही बुधवार (ता.१७ ऑगस्ट) सकाळी अकरा वाजता ‘कल्पनाविलास’ या निवासस्थानी कुटुंबासह स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राष्ट्रगीत वंदना गाऊन देशा प्रती प्रेमाची भावना व्यक्त केली. या त्यांच्या उपक्रमाबद्दल मान्यवरांनी त्यांना मनापासून शुभेच्छा दिल्या.
भारत सरकारने देशभरात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवांतर्गत विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले होते. त्याचाच भाग म्हणून बुधवारी दि १७ रोजी सकाळी ११:०० ते११:०१ दरम्यान (एक मिनीट) सामूहिक राष्ट्रगीत हा उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार श्री विलास गडांकुश यांच्या प्रबळ इच्छाशक्तीने त्यांनी बरोबर अकरा वाजता कोणत्याही परिस्थितीत देशप्रेमासाठी स्वतःच्या पायावर उभे राहून राष्ट्रगीत म्हणण्याचा निश्चय केला.आज उभे राहून त्यांनी आपल्या घरी दूरदर्शनवर पहात राष्ट्रगीताला मानवंदना दिली.
महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक नागरिकाने ‘सामूहिक राष्ट्रगीत उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. त्याला प्रतिसाद म्हणून वडूज ता. खटाव येथे श्री. गडांकुश यांनी पत्नी सेवानिवृत सौ. कल्पना, चिरंजीव कृणाल ,सून सौ ऋतुजा व नात कुमारी एंजल व चार महिन्यांची समंथा यांच्या समवेत सामुदायिक राष्ट्रगीत वंदना ग्रहण केली.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या ‘स्वराज्य महोत्सव’ सुरू असून, या महोत्सवाअंतर्गतच सामूहिक राष्ट्रगीत गायन ही अभिनव संकल्पना पुढे आलीआहे. राज्यातील अबालवृद्धांनी या उपक्रमात सहभागी होऊन नवा विक्रम स्थापित करावा, असे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. हा उपक्रम राज्यातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्यासाठी,प्रशासनाने याबाबत आवश्यक ती सर्व कार्यवाही करावी, असा
आदेशही त्यांनी दिला होता.
एकेकाळी खटाव तहसीलदार पदी विराजमान झाले असताना ध्वजारोहण करणाऱ्या श्री गडांकुश यांनी सेवानिवृत्त झाल्यानंतर ही देशप्रेम व समाजसेवा सुरूच ठेवली आहे. आज गोरगरिबांना मोफत पराठे वाटप करून त्यांनी आजच्या उपक्रमाबदल माहिती दिली. त्यांच्या या भूमिकेचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, दलित सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रेमानंद जगताप,आ जयकुमार गोरे,तसेच त्यांच्या वेळी कार्यरत असलेले वरिष्ठ सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी, विकास देशमुख, रेश्मा माळी व हेमंत दीक्षित आदि मान्यवरांनी कौतुक केले आहे.