पुणे : पुणे महापालिकेच्या कामगारांना सेवानिवृत्त झाल्यावर तत्काळ अंशदायी वैद्यकीय सहाय्यता योजनेचा लाभ दिला जात नव्हता. पेन्शन सुरू होईपर्यंत कर्मचाऱ्यांना योजनेच्या कार्डसाठी रखडत बसावे लागते. ही अडचण दूर करण्याचा निर्णय पुणे महापालिकेने घेतला आहे.
कर्मचाऱ्यांना या योजनेचा सेवानिवृत्त झाल्यावर देखील तत्काळ लाभ मिळणार आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या पगारातून १ टक्का रक्कम घेतली जात आहे. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला होता. त्यानुसार आरोग्य विभागाने काम सुरू केले आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून कर्मचारी, सेवानिवृत्त कर्मचारी, आजी माजी नगरसेवकांसाठी अंशदायी वैद्यकीय सहायता योजना सुरू आहे. या आरोग्य योजनेचा सेवकांना चांगला फायदा होतो. मात्र, सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना, ज्यांना अजून पेन्शन सुरू झाली नाही, त्यांना या योजनेचे कार्ड दिले जात नाही. काही तांत्रिक कारणाने पेन्शन मिळण्यास विलंब होतो.
आरोग्य विभागाच्या या नियमांमुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत होते. दरम्यान, सफाई कर्मचारी समन्वय समितीची बैठक अतिरिक्त आयुक्त (ई.) यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये मनपाच्या सफाई कर्मचाऱ्याच्या अडीअडचणी, प्रश्न यांची चर्चा झाली. समितीच्या सदस्यांनी असा मुद्दा मांडला की, अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ सेवानिवृत्त सेवकांना दिला जात नसल्याने त्यानां खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास अत्यंत हालअपेष्टा व खर्च सहन करावा लागत आहे.
त्यामुळे सेवानिवृत्तीनंतर लगेच त्यांना अंशदायी वैद्यकीय सहाय्य योजनेचा लाभ सुरू करावा, अशी मागणी बैठकीत करण्यात आली होती. त्यानुसार बैठकीत सेवानिवृत्त होणाऱ्या सेवकांना पेन्शन सुरू होण्यासाठी लागणारा कालावधी विचारात घेता सेवकांच्या शेवटच्या महिन्यातील वेतनाच्या मूळ वेतन, महागाई भत्ता यावर १ टक्का रक्कम आकारून त्यांना वैद्यकीय सहाय्य योजना लगेच लागू करावी, असा निर्णय घेण्यात आला.