लोणी काळभोर (पुणे) : वर्षभर लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, संस्था,संघटना यांच्या बातम्या प्रसिद्ध करूनही जाहिरात न देणाऱ्या व जाहिरात प्रकाशित केल्या नंतर बील न देणाऱ्या वा देण्यास टाळाटाळ करणाऱ्या राजकीय नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, संस्थांच्या, संघटनांच्या बातम्यावर व बातमीत नावे टाकण्यावर निर्बंध टाकण्याचा निर्णय हवेली तालुका पत्रकार संघाचे मासिक बैठकीत सर्वानुमते घेण्यात आल्याची माहिती हवेली तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष बापूसाहेब काळभोर यांनी दिली आहे.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील मधुबन मंगल कार्यालय या ठिकाणी रविवारी (ता. ११) मासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा निर्णय घेण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा पत्रकार संघाचे जिल्हा समन्वयक सुनील जगताप, हवेली तालुकाध्यक्ष बापूसाहेब काळभोर, तुळशीराम घुसाळकर, संदीप बोडके, अमोल अडागळे, अमोल भोसले, विजय काळभोर, सचिन माथेफोड, सचिन सुंबे, हनुमंत चिकणे, चंद्रकांत दुंडे, जितेंद्र आव्हाळे, शहाजी नगरे, रियाज शेख, विजय तुपे आदी पत्रकार उपस्थित होते.
हवेली तालुका पत्रकार संघाच्या सभासद पत्रकारांच्या कार्यक्षेत्रातील मान्यवर राजकीय पक्ष, व्यक्ती, संघटना, संस्था, सामाजिक कार्यकर्ते, यांनी दैनिकांना, यु ट्यूब चॅनलला, पोर्टलला वर्षातून कमीत कमी दोन वेळा योग्य प्रकारे जाहीरात देऊन, त्याचे बिल वेळेत दिले तरच त्यांनी घेतलेल्या कार्यक्रमांची बातमी व नावांचा समावेश करावा अन्यथा अशा व्यक्ती, संस्था, संघटना, राजकीय पक्ष व सामाजिक कार्यकर्ते यांच्या बातम्या व नावे छापू नये असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. याची अंमलबजावणी आजपासूनच सुरु करण्यात येणार असल्याची माहिती बापूसाहेब काळभोर यांनी दिली.