केडगाव / संदीप टूले : राज्य सरकारने संविधानाच्या चौकटीमध्ये राहून मराठा समाजाला आरक्षण द्यावे. या लढाईमध्ये आम्ही त्यांच्यासोबत आहोत व त्यांना हे आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही सहमत आहोत. पण सरसकट कुणबी दाखले देऊन आरक्षण मिळालेच पाहिजे म्हणून हे जे काही निवडक मंडळी प्रयत्न करत आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने त्यांच्या कुठल्याही दबावाला बळी पडू नये, असे ॲड. महेश भागवत यांनी सांगितले.
चौफुला येथे दौंड तालुका समन्वयक समितीची श्रीकृष्ण मंगल कार्यालयामध्ये रविवारी (दि.10) बैठक पार पडली. ही बैठक आनंद थोरात व महेश भागवत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यामध्ये भागवत म्हणाले, ‘संविधानाची चौकट न मोडता, ओबीसी समाजावर अन्याय होऊ न देता असा कुठलाही निर्णय करू नये म्हणून विनंती करण्यासाठी व आगामी काळातील रणनीती ठरवण्यासाठी या बैठकीचे आयोजन केले आहे. कुणबी दाखल्यांचा जो काळा बाजार चालू आहे तो शासनाने लक्ष घालून त्वरीत थांबवावा.’
यावेळी पांडुरंग मेरगळ म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा अजिबात विरोध नाही. पण ओबीसी कोट्यातून नकोच. मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र देऊ नका. नाहीतर आम्ही तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही त्यांनी सरकारला दिला.
एम्पिरिकल डाटामध्ये दाखवली गेली ओबीसींची संख्या कमी
या बैठकीमध्ये चार मुद्दे मांडण्यात आले. राज्य सरकारने एम्पिरिकल डाटामध्ये ओबीसींची संख्या कमी दाखवली गेली आहे, ती तत्काळ रद्द करावी. तसेच आता जो नवीन एम्पिरिकल डाटा जमा केला आहे. त्यातील डाटा सर्वसामान्यांना विश्वासात न घेता सादर केला. तो डाटा मान्य करू नये. जो जमा केलेला डाटा तालुकानिहाय खुला करावा. त्यामुळे यातील फोलपणा सर्वसामान्यांच्या निदर्शनास येईल, असे त्यांनी सांगितले.
ओबीसींची जनगणना झाली पाहिजे
अहिल्याबाई होळकर, महात्मा फुले, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांचे पुतळे उभे करावेत. तसेच ओबीसींची जनगणना झाली पाहिजे. महाराष्ट्रातील काही घटक ओबीसीच्या कोट्यातून आरक्षण मागत आहेत. त्यांना ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाला हात न लावता वेगळ्या कोट्यातून आरक्षण द्यावं. तसेच नॉन क्रिमिलेअरची अट रद्द करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
यावेळी आनंद थोरात, महेश भागवत, पांडुरंग मेरगळ, बाळासाहेब तोंडे पाटील, नामदेव बारवकर, संजय ईनामके, ऍड. दौलत ठोंबरे, अर्चना पाटील, शुभांगी धायगुडे, सुनील सोडनवर, अर्जुन टुले, डॉ. भागवत, बापूराव भागवत, नितीन जगताप तसेच दौंड तालुक्यातील ज्येष्ठ आणि तरुण कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.