सातारा : कलेला देशाच्या सीमा नसतात आणि अव्वल कलाकार हा सर्व काळात श्रेष्ठ असतो याचे पुन्हा एकदा प्रत्यंतर येईल, अशी घटना नुकतीच घडली आहे. भारतातील सर्वश्रेष्ठ चित्रकार म्हणून गणले गेलेले राजा रविवर्मा यांच्या एका चित्राची प्रतिकृती सातारा येथील ख्यातनाम चित्रकार सागरनाथ गायकवाड यांनी घडवली आणि या प्रतिकृतीला पोलंडमधील बायगोसाझ येथील ॲलन गोल्डमन आणि अश्विनी गोल्डमन यांच्या दिवाणखान्यात स्थान मिळाले आहे. राजा रविवर्मा यांची चित्रशैली हुबेहूब साकारणारे सागरनाथ गायकवाड यांचे या निमित्ताने कलाक्षेत्रात अभिनंदन होत आहे.
पोलंडमधील अश्विनी गोल्डमन या मूळच्या सातारच्या. त्यांचे मूळ नाव अश्विनी पाटील. सातारा शहरातील जुन्या प्रभात टॉकीजच्या काशिनाथ पाटील यांचे चिरंजीव अविनाश पाटील यांची पत्नी. अश्विनी साताऱ्यात आल्या की, त्यांची इथल्या कलाक्षेत्रात काय हालचाल चालू आहे, यावर लक्ष असायचे.
भारताचे परदेशातले चित्र हे कायमच दारिद्र्य, झोपडपट्टी आणि गरिबी याच्याशी संबंधित असल्याचे अश्विनी यांना जाणवले. मात्र भारतीय चित्रकलेचा समृद्ध आणि श्रीमंत वारसा परदेशातील लोकांना समजावा म्हणून त्यांना भारतीय चित्रकलेचे प्रतिनिधित्व करणारे चित्र हवे होते. त्यासाठी अश्विनी यांच्या मातोश्री अमृता पाटील यांनी त्यांना सागरनाथ गायकवाड यांचे नाव सुचवले
अशातच त्यांची गाठ चित्रकार सागरनाथ गायकवाड यांच्याशी पडली आणि त्यांनी राजा रविवर्माच्या एका चित्राची प्रतिकृती आम्हाला करून द्याल का, असे विचारले. त्यावेळी सागरनाथ गायकवाड यांनी त्यासाठी तयारी दर्शवली आणि रवी वर्म्याचे कोणते चित्र आपल्याला प्रतिकृती स्वरूप हवे आहे, असे विचारले. त्यावेळी अश्विनी यांनी ‘हातात फळ घेतलेली दक्षिणात्य स्त्री’ हे चित्र सुचवले.
त्या चित्रातील रंगलेपन पद्धती आणि त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरील हावभाव याच्याशी पूर्णपणे प्रामाणिक राहात, सागरनाथ गायकवाड यांनी ते चित्र अल्पावधीत साकारले.
आता हे चित्र पोलंड मधील अश्विनी आणि ॲलन यांच्या दिवाणखान्यात विसावले आहे. हे दोघेही नुकतेच सातारला आले असता या चित्राचे हस्तांतरण त्यांच्याकडे करण्यात आले. सातारकर चित्रकाराचा आंतरराष्ट्रीय पातळीवर अशा प्रकारे गौरव झाला असून त्यानिमित्त सागरनाथ गायकवाड यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.