प्रा.सागर घरत
करमाळा: करमाळा व इंदापुर या दोन तालुक्यांना जोडणारा डिकसळ येथील पूल अवजड वाहनांसाठी ५ दिवसांपूर्वी मंगळवारी (ता.११) बॅरिकेटर्स लागून बंद करण्यात आला होता. मात्र काही अज्ञातांनी या पुलावरी बॅरिकेटर्स हटवून अवजड वाहतुकीसाठी रस्ता सुरु केला आहे. तर वाहनचालकांच्या संरक्षणासाठी बांधकाम विभाग बॅरिकेटर्स पुन्हा बसविणार आहे.
कोंढारचिंचोली (ता. करमाळा) येथील भीमा नदीवरील ब्रिटिश कालीन पुल जड वाहतूकीसाठी धोकादायक बनल्यामुळे अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी म्हणून लोखंडी बॅरिकेटर्स लावून बंद केला आहे. परंतु, अवघ्या चारच दिवसात अज्ञातांनी शुक्रवारी (ता.१४) रात्री लोखंडी बॅरिकेटर्स गॅस कटरच्या सहाय्याने कापून काढले. त्यामुळे बॅरिकेटर्स साठी झालेला शासकीय निधी वाया गेला आहे.
कोंढार चिंचोलीचे माजी सरपंच देविदास साळूंके म्हणाले कि, साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू झाला असुन, ऊस वाहतूकीच्या उद्देशाने हा प्रकार झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.त्यामुळे प्रशासनाने तपास करुन संबधितांवर गुन्हा दाखल करून बॅरीकेटर्स ची दुरुस्ती करावी. अशी मागणी साळुंखे यांनी केली आहे.
करमाळा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुनीलकुमार वाघ म्हणाले कि, बॅरिकेटर्स काढल्याची माहिती मिळताच सदर ठिकाणी पाहणी केली आहे.जेसीबी व गॅस कटरने बॅरिकेटर्स काढल्याचे निदर्शनास आले.उपअभियंता के.एम.ऊबाळे यांच्याकडे अहवाल सादर केला आहे.वरीष्ठ गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निर्णय घेतील.त्यानंतर बॅरिकेटर्स बसवण्यात येईल.