बीड : बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे. या प्रकरणात धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडचे नाव समोर येत आहे. त्यामुळे मंत्रिपदी असलेल्या धनंजय मुंडेंच मंत्रिपद काढून घ्यावं, अशी मागणी होताना दिसत आहे. अशात आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदाराकडून धनंजय मुंडेंचे मंत्रिपद काढून घेण्याची मागणी केली जात आहे.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांनी आक्रोश मोर्चा काढला. या मोर्च्याला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी या मोर्चातून बोलताना प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडेंचे मंत्रिपद काढून घ्यावं, अशी मागणी पुढे केली आहे.
नेमकं काय म्हणाले प्रकाश सोळंके?
प्रकाश सोळंके यावेळी म्हणाले की, हा (वाल्मिक कराड) फोन करून पोलीस स्टेशनला सांगायचा, याचा उचला, 307 मध्ये अडकवा, 302 मध्ये अडकवा, हजारो निरपराध लोकांवर खटले दाखल केले गेले. गोदावरी निधीतीन 300 हायवा वाळूचा उपसा करतात. कुणाच्या आहेत या हायवा? असा सवाल करत सोळंके यांनी वाल्मिक कराडची सगळी क्रिमिनल हिस्टरी सांगितली.
सोळंके पुढे म्हणाले, ज्यांनी या वाल्मिक कराडच्या मागे ही मोठी शक्ती उभी केली. ते धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्यास या केसमध्ये न्याय मिळणार नाही. त्यामुळे जो पर्यंत या केसचा निकाल लागतं नाही, तो पर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घ्यावं आणि निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे, अशी मागणी मी बीड जिल्ह्याच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करतो, असेही सोळंखे यांनी सांगितले आहे. त्यामिळेता स्वपक्षीय नेत्यानेच केलेल्या मागणीनंतर आता अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय निर्णय घेतात? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.