नवी दिल्ली: ‘बोर्नव्हिटा’ माहित नसेल अशी व्यक्ती आपल्या क्वचितच सापडेल. ‘बोर्नव्हिटा’ हे लहान मुलांमध्ये कमालीचे लोकप्रिय असलेले पेय आहे. मात्र, आता याच ‘बोर्नव्हिटा’बद्दल भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ई-कॉमर्स कंपन्यांना त्यांच्या पोर्टल आणि प्लॅटफॉर्मवरील ‘हेल्थ ड्रिंक्स’च्या कॅटेगरीमधून बोर्नव्हिटासह सर्व ड्रिंक्स आणि बेव्हरेज काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. 10 एप्रिल रोजी जारी केलेल्या मागर्दशकतत्वांमध्ये मंत्रालयाने म्हटले आहे की, “नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR)ने सीआरपीसी कायदा 2005 च्या कलम 14 अंतर्गत केलेल्या तपासणीनंतर असा निष्कर्ष काढला आहे की, कोणतेही पेय हे ‘हेल्थ ड्रिंक’ नाही. देशातील अन्न कायद्यांतर्गत पेय हे आरोग्य पेय म्हणून परिभाषित केलेले नाही. एनसीपीसीआरने केलेल्या तपासणीनंतर बोर्नव्हिटामधील साखरेची पातळी स्वीकार्य मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे समोर आले आहे.
यापूर्वी, एनसीपीसीआरने भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ला सुरक्षा मानके आणि मार्गदर्शक तत्त्वे पूर्ण करण्यात अयशस्वी ठरलेल्या कंपन्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याचे आवाहन केले होते. काही कंपन्यांवर पॉवर सप्लिमेंट्स ‘हेल्थ ड्रिंक्स’ म्हणून सादर केल्याचा आरोप आहे. नियामकाच्या म्हणण्यानुसार, देशाच्या खाद्य कायद्यांमध्ये ‘हेल्थ ड्रिंक्स’ची व्याख्या नाही आणि या नावाने काहीही विकणे हे नियमांचे उल्लंघन आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला, एफएसएसएआयने ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना देखील डेअरी-आधारित किंवा माल्ट-आधारित पेये ‘हेल्थ ड्रिंक्स’ म्हणून लेबल न करण्याचे निर्देश दिले होते. गेल्या वर्षी, सर्वोच्च बालहक्क संस्था एनसीपीसीआरने माँडेलेझ इंडियाच्या मालकीच्या ब्रँड बोर्नव्हिटाला सर्व “भ्रामक” जाहिराती, पॅकेजिंग आणि लेबल मागे घेण्याचे निर्देश दिले होते. त्यात साखरेचे प्रमाण सामान्यपेक्षा जास्त असल्याचा दावा एका व्हिडिओमध्ये करण्यात आला होता.