योगेश मारणे / न्हावरे : पुणे जिल्ह्यातील शिरूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या दुरक्षेत्र पोलीस ठाण्यांमध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रार घेण्यासाठी पोलिसांकडून टाळाटाळ केली जात आहे. एवढच नाही तर पोलीस कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना दमबाजी देखील केली जात आहे. अशा पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे शिरूर तालुका अध्यक्ष तथा ग्राहक संरक्षण परिषदेचे अशासकीय सदस्य संपत फराटे यांनी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
पत्रात म्हटले आहे की, शिरूर तालुक्याच्या पूर्व भागातील मांडवगण फराटा व न्हावरे येथे पोलीस दूरक्षेत्र आहे. या दुरक्षेत्रांमध्ये सहायक पोलीस निरीक्षक व पाच ते सहा पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक आहे. गेल्या दोन महिन्यांपासून मांडवगण फराटा परिसरात छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे प्रमाण संख्येने वाढले आहे. या परिसरातील अनेक गावात घरफोड्या, विद्युत मोटारी व विद्युत केबलची चोरी तसेच शेतातील कापूस चोरीच्या विविध घटना घडल्या आहेत.
त्यामुळे परिसरातील नागरिक तक्रारी देण्यासाठी पोलीस स्टेशनला येत असतात. मात्र, पोलीस कर्मचारी हे फिर्यादीलाच आरोपी सारखी वागणूक देत असल्याच्या अनेक तक्रारी नागरिकांनी ग्राहक पंचायतीकडे केल्या होत्या. अशाच पद्धतीने न्हावरे पोलीस दूरक्षेत्रामध्ये मागील काही दिवसांमध्ये तक्रारी घेण्यास टाळाटाळ केली जात आहे.
कायदा व सुव्यवस्था राखणे हे पोलीस प्रशासनाचे काम असते, मात्र गेल्या काही दिवसापासून पोलीस प्रशासनाकडे न्याय मागण्यासाठी गेलेल्या नागरिकांना पोलिसांकडून दमबाजी केली जात आहे. तसेच त्यांची तक्रार साध्या कागदावर घेतली जात असून, त्यांना त्याची कुठलीही पोहोच दिली जात नाही. तसेच कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे संबंधित पोलीस कर्मचारी आपल्या कर्तव्यात कसूर करत असल्याचे दिसून येत आहे. अशा संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करुन कारवाईचा अहवाल मिळावा असे ग्राहक पंचायतीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना दिलेल्या लेखी पत्रात म्हटले आहे.
पोलीस कर्मचाऱ्याबाबत नागरिकांच्या तक्रारी असतील तर त्यांनी थेट शिरूर पोलीस स्टेशनला येऊन माझ्याशी संपर्क साधावा. पोलीस कर्मचारी हे नागरिकांना त्रास देत असल्याचे आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल.
पोलीस निरीक्षक संदेश केंजळे, शिरूर पोलीस स्टेशन