पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून गुइलेन बॅरे सिंड्रोम (जी बीएस ) या आजाराने थैमान घातले होते. मात्र आता पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू झालेल्या जीबीएस रुग्णांचा उद्रेक आता मार्च महिन्यात उतरणीला लागला आहे. आतापर्यंत 230 रुग्णांचे निदान झाले असून त्यापैकी 183 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. नवीन रुग्णांची संख्या घटली असून मृत्यू देखील घटल्याची माहिती समोर आली आहे.
नववर्षाच्या मुहूर्तावर पुणे शहराच्या सिंहगड रस्ता परिसरात अचानक जीबीएसचे रुग्ण वाढायला सुरुवात झाली. नागरिकांना आधी उलट्या जुलाब व नंतर हातापायातील शक्ती जाऊन रुग्णांची शरीर लुळे पडायला लागले. जानेवारी महिन्याच्या अखेरीस रुग्ण संख्या 130 झाली. दरम्यान आता मार्च महिन्यापासून या रुग्णसंखेत मोठ्या प्रमाणात घट होत आहे. आतापर्यंत 230 रुग्णांची निदान झाले असून त्यापैकी 183 रुग्ण (80 टक्के) बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 35 रुग्णांवर उपचार सुरू असून 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मार्च महिन्यात जीबीएस उद्रेकाला उतरणी लागली असून नागरिकांना आता दिलासा मिळाला आहे.
पुणे शहरात रुग्णांची संख्या वाढायला लागल्यावर महापालिका अलर्ट मोडवर आली. दूषित पाण्यामुळे या रोगाचा प्रसार होत असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर महापालिकेकडून शहरातील पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करण्यात आली. दरम्यान शहरात जीबीएस रुग्णांच्या संकेत घट झाल्याची पाहायला मिळत आहे.