पुणे : राज्यात महायुती सरकार सत्तेत आणण्यात गेमचेंजर ठरलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या तिजोरीवर भार आल्याचं वक्तव्य महायुती सरकारमधील अनेकांनी आतापर्यंत केलं. त्यामुळे ही योजना बंद होणार असल्याची टीकेची झोड विरोधकांनी उठवली. मात्र आता यावर महायुतीमधील क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलेल्या वक्तव्याने लाडक्या बहिणींना दिलासा मिळाला आहे.लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर बोजा आला आहे, मात्र शेतकरी कर्जमाफी किंवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद होणार नाही असा खुलासा त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत लाभार्थी महिलांना जुलै ते मार्च महिन्याचे पैसे सरकारकडून देण्यात आले आहेत. तसेच लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचं वारंवार सरकारच्या मंत्र्यांकडून सांगण्यात येत असतं. आता क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे याबाबत बोलताना म्हणाले, शेतकरी कर्जमाफी, शेतकरी पिक विमा अथवा लाडकी बहीण यातील कोणतीही योजना बंद केली जाणार नाही, याबाबत होत असलेली टीका योग्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केल आहे.तसेच शेतकरी आणि लाडक्या बहिणीसाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. एक रुपयात पीक विमा योजना बंद होण्याच्या चर्चा सुरू आहेत , मात्र असे काही होणार नाही, असेही भरणे यांनी स्पष्ट केलं.
लाडक्या बहिणींनाही 2100 रुपये दिले जाणार असून ही योजना बंद होणार नाही याचाही त्यांनी पुनरुच्चार केला. त्यामुळे लाडक्या बहिणींना आता दिलासा मिळाला आहे.