पुणे : सिंहगडाच्या पायथ्यापासून माथ्यापर्यंत विखुरलेल्या खाद्यपदार्थांच्या टपऱ्या महिनाभरात एका छताखाली येणार असून माथ्यावरील पठारावर ‘फूड मॉल’ प्रमाणे एकाच रांगेत सर्व स्टॉल चालकांचे पुनर्वसन करण्यात येणार असल्याचा निर्णय वन विभागाच्या वतीने घेण्यात आला आहे.
त्याबरोबरीने वाहतुकीला ठरणारे व पार्किंगची जागा अडविणारे सर्व लहान मोठे स्टॉल हटविण्यात येणार आहेत.
गडावरील हॉटेलचालकांनी पुढील चार दिवसांत त्यांचे अतिक्रमण काढावे. यातील निश्चित केलेल्या ७१ स्टॉलधारकांचे महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळाच्या विश्रामगृहाजवळ, ‘ओपन थिएटर’ लगतच्या जागेत पुनर्वसन करण्यात येईल, अशा सूचना वनाधिकाऱ्यांनी मंगळवारी गावकऱ्यांना दिल्या.
वन विभागाचे अधिकारी, वनसंरक्षण समिती आणि घेरा समितीतील गावांतील सरपंचांच्या उपस्थितीत मंगळवारी सिंहगडावर बैठक घेण्यात आली. स्टॉलची जागा, खाद्यपदार्थांची विक्री, प्लास्टिक कचऱ्याबद्दल या वेळी चर्चा करण्यात आली.
सिंहगडावर गेल्या काही वर्षांत पार्किंगपासून गडाच्या शेवटच्या टोकापर्यंत चौकाचौकांत टपऱ्या उभ्या राहिल्या आहेत. स्टॉलधारकांची संख्या दुप्पट झाली आहे. गावातील काही कुटुंबांनी पार्किंगमध्ये एक, तर दुसरा माथ्यावर एक अशा एकापेक्षा जास्त टपऱ्या वाढल्या आहेत.
वेगाने वाढणाऱ्या या अतिक्रमणांना रोखण्यासाठी वन विभागाने वर्षभरापूर्वी हॉटेलचालकांना नोटीस दिल्या होत्या. करोनाची परिस्थिती निवळल्यावर चालकांनी स्वतः टपऱ्या कमी कराव्यात; अन्यथा अतिक्रमण कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला होता.
मात्र, विक्रेत्यांनी कार्यवाही न केल्याने वनाधिकाऱ्यांनी शेवटचा इशारा देण्यासाठी मंगळवारी बैठक घेतली. वन परिमंडल अधिकारी बाळासाहेब लटके, वनरक्षक बाळासाहेब जिवडे, वन संरक्षण समितीचे माजी अध्यक्ष दत्ता जोरकर, इतर पदाधिकारी आणि घेरा सिंहगडमधील गावांचे सरपंच उपस्थित होते