खोपोली: कर्जत विधानसभा मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलेल्या सुधाकर घारे यांनी २३ नोव्हेंबर रोजी लागलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाला आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली होती. निवडणूक आयोगाने सुधाकर घारे यांची मागणी मान्य केली असून कर्जत मतदारसंघात फेरमतमोजणी होणार आहे. त्यामुळे आता निकाल काय येतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कर्जत-खालापूर मतदारसंघातील जनता महेंद्र थोरवे यांच्याविरोधात होती. येथील जनतेने मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कर्जत-खालापूरमधील जनता आम्ही सुधाकर घारे यांना मतदान केल्याचे सांगत असताना निकाल वेगळा कसा लागला? असा प्रश्न सुधाकर घारे यांनी उपस्थित केला होता. खोपोलीमध्ये मतदानाच्या दिवशी बोगस मतदान झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी कबूल केल्याचे घारे यांचे म्हणणे आहे. असे अनेक संशयास्पद मुद्दे दाखवून सुधाकर घारे यांनी निवडणूक आयोगाकडे फेरमतमोजणीची मागणी केली होती.
२३ नोव्हेंबर रोजी झालेल्या मतमोजणीत सुधाकर घारे यांचा ५,६९४ मतांनी निसटता पराभव झाला. एकूण २६ पैकी २२ फेऱ्यांमध्ये सुधाकर घारे आणि महेंद्र थोरवे यांच्यात जोरदार रस्सीखेच होती. मात्र, खोपोली नगरपालिकेच्या हद्दीत थोरवे यांनी आघाडी घेतल्यामुळे खोपोलीत गडबड झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे गेलेल्या सुधाकर घारे यांनी निकालाला आव्हान देत फेरमतमोजणीची मागणी केली होती. त्यावर निवडणूक आयोगाने सुधाकर घारे यांची मागणी मान्य केली आहे. त्यामुळे फेरमतमोजणी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.