पुणे : पुण्यातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्येबाबत खळबळजनक माहिती समोर आली आहे. या हत्येची सुपारी सतीश वाघ यांच्या पत्नीकडूनच देण्यात आल्याची माहिती बुधवारी समोर आली होती. सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ यांचे अक्षय जावळकर या तरुणासोबत अनैतिक संबंध होते. याच अनैतिक संबंधामध्ये अडसर ठरत असल्यामुळे सतीश वाघ यांची हत्या करण्यात आली.
अक्षय आणि मोहिनी वाघ यांचे अनैतिक प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमात सतीश अडसर ठरत होते. त्यामुळे मोहिनीने अक्षयला हाताशी धरुन सतीश वाघ यांच्या हत्येचा कट रचला. हत्येसाठी पाच लाखांची सुपारी अक्षय जावळकरला दिली. वाघ यांच्या हत्या प्रकरणात त्यांची पत्नीच मास्टरमाइंड निघाली आहे. पुणे पोलीसांच्या गुन्हे शाखेने या गुन्ह्याची उकल केली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येचा मुख्य आरोपी त्यांची पत्नीच निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मोहिनी वाघचे वय 48 असून प्रियकर अक्षय जावळकर हा 32 वर्षांचा आहे. अक्षय हा मोहिनी वाघाच्या मुलाचा मित्र होता. मुलाच्या वयाचा असलेल्या अक्षय आणि मोहिनीचे अनैतिक संबंध असतील अशी शंका सुरुवातीला कोणाला आली नाही. मात्र, सतीश वाघ यांना हे समजताच मोहिनी वाघ, सतीश वाघ आणि अक्षय जावळकर यांच्यामध्ये काही कारणावरुन वाद सुरु झाले होते. अनेक वर्षे त्यांच्यातील वाद सुरुच होते आणि त्यातून सतीश वाघ त्यांची हत्या करण्यात आली.
आरोपी अक्षय हा सतीश वाघ यांच्याकडे पूर्वी भाडेकरू म्हणून राहत होता. त्या वेळी मोहिनीसोबत त्याचे प्रेमसंबंध निर्माण झाले. काही वर्षांपूर्वी सतीश वाघ यांना या प्रेमसंबधांचा सुगावा लागला. तेव्हापासून सतीश वाघ हे मोहिनी यांना सातत्याने मारहाण करायचे. सतीश यांच्यामुळे दोघांच्याही अनैतिक संबंधात अडथळे येत होता. या गोष्टीचा राग अक्षय जावळकर याच्या मनात धुमसत होता. या कारणामुळे ही हत्या झाली असल्याचं समोर आलं आहे.