पुणे : पुणे शहरातील विमानतळ भागात असलेल्या नामांकित ‘द हौज कम्युन’ या पबवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. रविवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास गुन्हे शाखेच्या पथकाने येथे अचानक धाड टाकली. शासनाने पब आणि क्लब चालवण्यासाठी रात्री 1.30 वाजेपर्यंतची मुदत निश्चित केली आहे. तरीही हा पब वेळेची मर्यादा ओलांडून पहाटेपर्यंत सुरू असल्याचे या छापेमारीत समोर आले.

गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. विमानतळ परिसरातील या पबमध्ये रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीरपणे पार्टी चालू असल्याची पक्की माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी पोलिसांनी पहाटे 3 वाजता पबवर छापा मारला. त्यावेळी डान्स फ्लोअरवर सुमारे 80 ते 100 तरुण-तरुणी डीजेच्या तालावर बेधुंद होऊन नाचताना आढळले.

पोलिसांनी या सर्व उपस्थितांना ताब्यात घेतले असून त्यांची सखोल चौकशी सुरू केली आहे. नियमांचे उल्लंघन करून पब उशिरापर्यंत सुरू ठेवल्याप्रकरणी पबचालक आणि व्यवस्थापकावर गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया तात्काळ हाती घेण्यात आली आहे. तसेच या पबकडे मद्यविक्रीचा अधिकृत परवाना उपलब्ध होता की नाही, याची पडताळणी पोलीस करत आहेत.

पुणे शहरात पब संस्कृतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावली लागू केली आहे. असे असतानाही दीडची मुदत संपल्यानंतरही पहाटे 3 वाजेपर्यंत कोणाच्या पाठिंब्याने हा पब सुरू होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. या घटनेमुळे शहरातील इतर पब चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे







