आदित्य बोराटे –

पुणे : उजनी जलाशयात पुन्हा एकदा दुर्मिळ प्रजातीचा जितडा मासा आढळून आला असून, त्याला बाजारात प्रतिकिलो ५९५ रुपये दर मिळाला आहे. सुमारे साडेसहा किलो वजनाच्या या माशाच्या विक्रीतून पळसदेव येथील युवा मच्छीमार युवराज नगरे यांना ३,८६७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. या घटनेमुळे उजनी जलाशयातील मत्स्यसंपदेची समृद्धी आणि जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

युवराज नगरे यांनी उजनी जलाशयात टाकलेल्या सुमारे अकरा बोटी व्यासाच्या जाळ्यात हा जितडा मासा अडकला. त्यानंतर त्यांनी तो कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भिगवण येथील मासळी उपबाजारातील अंबिका फिश मार्केटमध्ये विक्रीसाठी आणला. तेथे झालेल्या लिलावात बारामती येथील व्यापारी राकेश मोरे यांनी प्रतिकिलो ५९५ रुपये दराने या माशाची खरेदी केली.
उजनी जलाशयात यापूर्वीही गार, जितडा तसेच इतर काही वेगळ्या प्रजातींचे मासे आढळले आहेत. त्यामुळे जलाशयातील मत्स्यवैविध्य आणि बदलत्या पर्यावरणीय परिस्थितीबाबत अभ्यासकांचे लक्ष वेधले जात आहे. बाजारात जितडा माशाला असलेली मागणी लक्षात घेता, अशा माशांच्या पकडीमुळे मच्छीमारांना आर्थिकदृष्ट्याही चांगला फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उन्मेष काटवटे यांनी सांगितले की, उजनी हा जितडा माशाचा नैसर्गिक अधिवास नसला तरी हा मासा गोड्या पाण्यात सहज राहू शकतो. या प्रजातीमुळे स्थानिक पर्यावरणावर कोणताही विपरीत परिणाम होत नाही. उलट, चिलापीसारख्या काही माशांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्यास मदत होत असल्याने तो पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरतो. तसेच या माशाला बाजारात चांगली मागणी असल्याने मत्स्यव्यवसायिकांनाही त्याचा आर्थिक लाभ मिळतो.








