शिक्रापूर : एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे फोटो काढून व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत संबंधित पीडित मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.
याप्रकरणी पीडित मुलीने शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी एका व्यक्तीविरोधात बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. रोहन नप्ते असं गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान, आरोपीला अद्याप अटक झाली नसल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन तरुणीने रोहन नप्ते या युवकाशी काही दिवसांपूर्वी ओळख झाल्यानंतर रोहनने पीडित तरुणीशी ओळख वाढवून तिचे काही फोटो काढले. पुढील काही दिवसांत त्याने या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत एका हॉटेलमध्ये घेऊन जात तिच्यावर बलात्कार केला.
तसेच त्याने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी एका मोटारीमधून तिला सर्वत्र फिरविले. पुढील काळात या मुलीशी आपले लग्न लावले नाही, तर संपूर्ण कुटुंबीयांना जिवे मारण्याचीही धमकी दिली. याप्रकरणी अत्याचार सहन न झाल्याने पीडित मुलीने शिक्रापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी रोहन नप्ते याच्याविरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक महिला पोलिस उपनिरीक्षक रोहिणी सोनावले हे करत आहेत.